पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात विविध राजकीय पक्षांकडून गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून फेरी काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हाॅल चैाक) ते ब्ल्यू नाईल हाॅटेल रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे. आयबी चौकातून येणारी वाहने कौन्सिल हाॅल चौकातनू लष्कराच्या दक्षिण मुख्यालयमार्गे साधू वासवानी चौकाकडे जातील. ब्ल्यू नाईल चौकातून आयबी चौकाकडे जाणारी वाहने किराड चौक, साधू वासवानी पुतळा मार्गे किंंवा एसबीआय हाऊसमार्गे रेना रस्त्याने इच्छितस्थळी जातील. लष्कराचे दक्षिण मुख्यालय ते साधू वासवानी चौकाकडे ये-जा करणारी वाहने आवश्यकतेनुसार काहून रस्ता चौकातून वळविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>>एमआयएमकडून पुणे लोकसभेसाठी माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

बारामती, शिरुर, पुणे लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रास्ता पेठेतील शांताई हाॅटेल चैाक आणि क्वार्टर गेट चैाकात एकत्र येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सहा ते दुपारी दाेनपर्यंत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. बॅनर्जी चौकातून क्वार्टर गेट चौकाकडे जाणारी वाहने पाॅवर हाऊस चौकाकडे जातील. क्वार्टर गेटकडून येणारी वाहने लष्कर भागातील बच्चू अड्डा आणि सरबतवाला चौकातून इच्छितस्थळी जातील.