काळा दमा अर्थात क्रॉनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मनरी डिसीझ (सीओपीडी) या आजाराबाबत जनता, सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रातही माहितीचा अभाव असून जनजागृतीसाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आखण्याची गरज आहे. तंबाखू निर्मूलन किंवा क्षयरोग निर्मूलनासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमांना जोडूनच काळय़ा दम्याच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम आखता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात येत आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ. केशव देसीराजू यांनी शनिवारी सांगितले.
चेस्ट रीसर्च फाऊंडेशन आणि जॉन हॉपकिन्सतर्फे आयोजित ‘इंडिया नीड्स अ नॅशनल सीओपीडी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल प्रोग्रॅम’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये डॉ. देसीराजू बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी, हॉपकिन्स ग्रुपचे डॉ. श्याम बिस्वाल, डॉ. डी. क्रिस्तोफर, डॉ. सुरींदर जिंदाल, डॉ. रॉबर्ट विसे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. देसीराजू म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये काळा दमा असलेल्या रुग्णांचे आणि काळ्या दम्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ज्याप्रमाणे कर्करोग, मधुमेह, एड्स या आजारांबाबत आपल्याकडे जागृती झाली आहे, त्याप्रमाणेच काळ्या दम्याबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे. हा आजार प्रामुख्याने धुरामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला, तरुणी या आजाराला बळी पडत आहेत. या पाश्र्वभूमीवर धूरविरहीत चुली आणि गॅसचा वापर वाढवण्यासाठी जागरुकता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे काळ्या दम्याच्या निर्मूलन कार्यक्रमासाठी पर्यावरण, ऊर्जा, वाहतूक या विभागांचाही सहभाग आवश्यक आहे.’’