जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक आहे. दक्षिण कोरिया आणि चीनने दिवसाला चाचण्या करण्याचा वेग वाढवल्यामुळे त्यांना या धोकादायक व्हायरसवर नियंत्रण मिळवता आले. आता एका भारतीय कंपनीने सुद्धा स्वदेशी बनावटीचा Covid-19 पीसीआर किटची निर्मिती केली आहे.

पुणे स्थित मॉलिक्युलर डायग्नोसिस कंपनी मायलॅबने COVID-19 च्या चाचणीसाठी या टेस्ट किटची निर्मिती केली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या किटला मान्यता दिली आहे. या एका किटची किंमत ८० हजार रुपये असून, एकाचवेळी १०० रुग्णांची चाचणी करता येणे शक्य आहे.

आठवडयाभरात एक ते दीड लाख टेस्ट किटचे आम्ही उत्पादन करु शकतो. जनतेसाठी उत्पादन क्षमता वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयात केलेल्या किटच्या तुलनेत स्वदेशात बनवण्यात आलेल्या या किटची किंमत खूपच कमी आहे असे मायलॅबचे संशोधक रणजीत देसाई यांनी सांगितले.

अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या किटमुळे करोना चाचणीचा वेळ कमी होणार असल्याचा दावा माय लॅबने केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“मेक इन इंडियावर भर देत राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने COVID- 19 चा किट बनवण्यात आला आहे. हा किट बनवताना जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत आम्ही हा किट बनवला” असे मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले.

“सीडीएससीओ/एफडीए या नियामंक संस्थांनी तात्काळ उचललेली पावले, आयसीएमआर, एनआयव्ही, केंद्र आणि राज्य सरकारांनी या इमर्जन्सीच्या काळात केलेले सहकार्य खरोखर कौतुकास्पद आहे” असे रावल म्हणाले.