करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिक तत्पर

पुणे : परदेश प्रवास करुन आल्यानंतर स्वतहूनच १४ दिवस घरी राहण्याचा समजूतदार निर्णय काही पुणेकर नागरिकांकडून घेण्यात आला आहे. आम्हाला करोनाचा संसर्ग आहे की नाही हे माहिती नाही, पण असल्यास आमच्या मार्फत तो इतरांना होऊ नये म्हणून १४ दिवस घरीच राहाणार असल्याचे सांगून हे नागरिक परदेशातून परतलेल्या इतरांनाही हा समजूतदारपणा दाखवण्याचे आवाहन करत आहेत.

बावधन येथे राहाणारे एक जण नुकतेच लंडनहून परतले आहेत. त्यांनी सांगितले,की पुण्याहून लंडनला जाईपर्यंत पुण्यात रुग्ण नव्हते. लंडनमध्येही संसर्ग नव्हता. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्यानंतर रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे माझ्या तेथील कार्यालयाने सुटी जाहीर केली. पंधरा दिवसांचा दौरा मी एक आठवडय़ात संपवला आणि परत आलो. मला ताप, सर्दी, खोकला यांपैकी कोणताही त्रास नाही, तरी चौदा दिवस घरी राहायचे ठरवले आहे. सोसायटीने मला प्रोत्साहनच दिले आहे.

कामानिमित्त दोन महिने अमेरिकेत मुक्काम करुन परतलेल्या आयटी क्षेत्रातील व्यवस्थापकाने आपला अनुभव ‘लोकसत्ता’ला सांगितला. विमानतळावरील तपासणीत काहीही आढळले नसल्यामुळे मला घरी सोडण्यात आले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मी १४ दिवस घरी राहात आहे. माझ्या कंपनीतील सर्वच सहकारी घरातून काम करत आहेत, मीही त्याला अपवाद नाही. घरी मदतीसाठी येणाऱ्या मावशींना सुटी दिली आहे, त्यामुळे घरातील दैनंदिन गोष्टी करणे, वेबसिरीज पहाणे यांसारख्या गोष्टींमुळे वेळ घालवणे अवघड नाही. करोना विषाणू संसर्ग ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यामुळे परदेशातून येऊन देखील १४ दिवस घरी राहाण्याचा नियम न पाळणाऱ्यांनी याबाबत गंभीर व्हावे असे मला वाटते.

सोसायटीचा समजूतदारपणा!

‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचा परदेश दौरा अर्धवट सोडून अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता सिद्धेश पूरकर परतले असून आता १४ दिवस घरी राहाण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. कोणताही अटकाव न करता सोसायटीनेही उत्तम सहकार्य केले आहे. आम्हाला कोणतीही लक्षणे नाहीत, महापालिकेतर्फे दोन डॉक्टर येतात. तपासणी करतात. घरातील काम, स्वयंपाक, वाचन, चित्रपट, वेबसिरीज पाहणे अशा गोष्टींसाठी या वेळेचा विनियोग करणार असल्याचे सिद्धेश म्हणाला. पर्ण म्हणाली,की पहिले दोन रुग्ण येथील असूनदेखील सोसायटीने दाखवलेल्या समजूतदारपणाचे कौतुक वाटते. शहरातील इतर सोसायटय़ांनी या गोष्टीचा आदर्श घ्यावा असे वाटते. परदेशातून आलोय, मात्र आम्हाला कोणतीही लक्षणे नाहीत. खबरदारी म्हणून आम्ही घरी राहाण्याचे ठरवले आहे. जगभर करोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सर्वानीच स्वतसाठी हा नियम घालून घ्यावा, असे आवाहन पर्णने केले आहे.