राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढवाली आहे. पुण्यामध्येही लसींच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. याचसंदर्भात आज पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता. पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुण्यातील लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिके घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. अवघ्या ६० दिवसांमध्ये संपूर्ण पुण्यामध्ये लसीकरण पूर्ण करण्याची तयारी महापालिकेची आहे फक्त दोन गोष्टींची परवानगी आवश्यक असल्याचं बिडकर यांनी म्हटलं आहे.

पुणे महानगरपालिका लसीकरणाची सगळी जबाबदारी उचलायला तयार आहे. त्यासंदर्भात निधीसुद्धा आम्ही खर्च करु. तुम्ही आम्हाला ही लस विकत घ्यायची परवानगी द्या. तुम्ही परवानगी दिली तर आम्ही सीरमशी बोलू आणि लस विकत घेऊन येत्या साठ दिवसात १०० टक्के लसीकरण पूर्ण करु, असा विश्वास बिडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय.

कसं करणार नियोजन?

मतदानाला जी पद्धत वापरली जाते त्यापद्धतीने लसीकरण करण्याचा महापालिकेचा विचार आहे असं बिडकर यांनी स्पष्ट केलं आहे. “मतदान बुथ लावतो त्याप्रमाणे मतदानासाठी ज्या चिठ्ठ्या आपण देतो तशा चिठ्ठ्या देऊन नियोजित वेळी लसी नागरिकांना दिल्या जातील. आपले शिक्षक, महापालिकेचे कामगार यांचा मोठा एक ड्राइव्ह तयार करतोय आम्ही. ज्या माध्यमातून चार दिवसात संपूर्ण पुण्यातील नागरिकांना पाहिला डोस आणि महिन्याभराने चार दिवसात दुसरा डोस असं सगळं मिळून आपण साठ दिवसात हे लसीकरण पूर्ण करु शकतो. फक्त आपल्याला राज्य सरकारने परवानगी दिली पाहिजे आणि लस उपलब्ध झाली पाहिजे,” असं बिडकर म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांकडून मिळाला प्रतिसाद

यासंदर्भात पुणे महापालिकेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी प्रसिसाद दिल्याचंही बिडकर यांनी सांगितलं. “याबद्दल काल मुख्यमंत्री उद्धवजींचं उत्तरही आलं की तुमचं पत्र पुढील विभागाकडे पाठवलं असून त्याबद्दलचा पाठपुरावा सुरु आहे,” असं बिडकर म्हणाले.

मागील काही आठवड्यांपासून देशामध्ये सर्वाधिक करोनाबाधित आढळणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचेही नाव असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.