पुण्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण अढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांबद्दलची अधिक माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. नायडू रुग्णालयामध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या दोघांनाही २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबई दौरा केला होता. हे दोन्ही रुग्ण १ मार्च रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेथून ते ओला टॅक्सीद्वारे पुण्याला आले. या टॅक्सी चालकाची ओळख पटली असून त्यालाही नायडू रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली आहे.

भारतात परतल्यानंतर या दोन्ही रुग्णांना सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होऊ लागल्याने ते रविवारी नायडू रूग्णालायात चाचणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या करोनाच्या चाचण्यांमध्ये दोघांना करोना झाल्याचे समोर आलं आहे. सध्या या दोघांवर उपचार सुरू करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली आहे.

करोनाची लागण झालेले हे दोन्ही रुग्ण ४० जणांबरोबर दुबईला गेले होते. त्यामुळे या चाळीस जणांची माहितीही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आली असून त्यांच्या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे म्हैसकर यांनी स्पष्ट केलं. “आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच या दोन्ही रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या तसेच त्यांच्याबरोबर दुबई दौऱ्याहून परतलेल्या प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील हे दोन्ही रुग्ण ओला टॅक्सीने मुंबईहून पुण्यात आले. या टॅक्सी चालकाची ओळख पटली असून त्यालाही देखरेखीखाली नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” असं म्हैसकर म्हणाले. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेल्याचेही म्हैसकर यांनी सांगितले.