वीजजोडणीच्या प्रकरणामध्ये लाच घेताना ‘महावितरण’चे चार अधिकारी रंगेहात पकडले गेल्याने कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला आहे. मात्र, वीजजोडणीच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा कृती मानकांनुसार (एसओपी) पारदर्शक कार्यवाही केली जात नसल्यानेच लाचखोरीचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वीजजोडणीच्या प्रकरणांमध्ये कृती मानकांचे पालन व्हावे व त्यातून पादर्शकता निर्माण करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
‘महावितरण’च्या पद्मावती विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईमध्ये वीजजोड देण्याच्या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व दोन कनिष्ठ अभियंत्यांना रंगेहात पकडण्यात आले. या पाश्र्वभूमीवर सजग नागरी मंचच्या वतीने अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन पाठवून कृती मानकांनुसार कारभार पारदर्शक करण्याबाबत मागणी केली आहे.
वीजपुरवठय़ाची जबाबदारी असलेल्या कंपनीसाठी राज्य वीज नियामक आयोगाने काही कृती मानके घालून दिली आहेत. या कृती मानकांमध्ये प्रत्येक कामाचा कालावधी व त्याची माहिती जाहीर करण्याबाबत नियम घालून दिलेले आहेत. नव्या वीजजोडणीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सात दिवसांत जागेची तपासणी, १५ दिवसांत कोटेशन व तीस दिवसांत जोडणी, असा नियम आहे. याबाबत प्रलंबित व निकाली काढलेल्या अर्जाची सद्यस्थिती प्रत्येक आठवडय़ाला उपविभाग व विभागाच्या फलकावर त्याचप्रमाणे ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली पाहिजे.
प्रत्येक उपविभागात कोणत्या ट्रान्सफार्मरवर किती वीजभार शिल्लक आहे. त्याचप्रमाणे नवीन वीजजोडणीसाठी काही पायाभूत सुविधा उभारायच्या असतील, तर त्या किती दिवसांत उभारणार. ग्राहकाने त्याच्या निकडीमुळे पायाभूत सुविधा उभारली, तर महावितरण त्याला केव्हा व कसा परताना देणार याचीही माहिती फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली पाहिजे. प्रत्येक उपविभागाला नवीन मीटरची मागणी किती आहे. त्यापैकी किमी मीटर उपलब्ध आहेत व किती मागणी प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे मीटरचे वितरण पहिली मागणी असणाऱ्यांना पहिल्यांदा देणे, या पद्धतीने होते का, याचीही माहिती अशाच पद्धतीने जाहीर झाली पाहिजे.
कृती मानकांनुसार अनेकदा कार्यवाही होत नसल्याने त्याचप्रमाणे अधिकारी कायदे व नियमांचा सर्रास भंग करीत असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच असा मानहानीचा प्रसंग निर्माण झाला असल्याकडे वेलणकर यांनी लक्ष वेधले आहे. कारभार पारदर्शक झाला तर हे प्रसंग टाळता येतील. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.                                                                                                वरिष्ठांपेक्षा कनिष्ठ अभियंतेच अधिक गडगंज
वीजजोडणीच्या प्रकरणात लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ‘महावितरण’च्या चार अधिकाऱ्यांकडे कोटय़वधीची माया असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे उपकार्यकारी अभियंत्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी अधिक गडगंज असल्याचेही या तपासणीत उघड झाले. चारही अधिकाऱ्यांची कोटय़वधीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावती विभागाचे कार्यकारी अभियंता भानुदास भगवंत भोसले (वय ५६) यांच्या घरझडतीमध्ये ३४ लाख ५३ हजारांची मालमत्ता आढळली. त्यात दोन सदनिका, दागिने, वाहने आदींचा समावेश आहे. उपकार्यकारी अभियंता प्रशांत दत्तात्रय पराते (वय ४७) यांच्याकडे ६३ लाख १६ हजारांची संपत्ती आढळली. कनिष्ठ अभियंता सदाशिव चंदन सरपाले (वय ५४) यांच्या नावावर ६० लाख ७७ हजारांची संपत्ती आहे. त्यांच्या घरातून २२ लाख ३७ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. कनिष्ठ अभियंता लक्ष्मीकांत गंगाराम जोंधळे (वय ४५) यांच्याकडे तब्बल ८७ लाख ७० हजारांची मालमत्ता आढळून आली.