स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून परत सत्र न्यायालयात पाठविल्यानंतर मानेचा शिक्षेवर जबाब घेण्याच्या कामकाजाला मंगळवारी सुरुवात झाली. कामकाजाच्या वेळी काही प्रश्नांवरून बचाव पक्षाचे वकील आणि न्यायाधीश यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर बचाव पक्षाकडून माने हा शिक्षेवर जबाब देण्यास मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे, हे पाहण्यासाठी वैद्यकीय तपासणी करावी म्हणून अर्ज करण्यात आला. त्यावर सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या खटल्याची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.
संतोष मानेला सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या विरुद्ध माने याने उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलाच्या वेळी माने याला शिक्षेवर म्हणणे मांडण्यास दिले नसल्याचा बचाव आरोपीचे वकील अॅड. धनंजय माने यांनी केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून शिक्षेवर मानेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी खटला परत सत्र न्यायालयाकडे पाठविला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास न्यायाधीश व्ही.के.शेवाळे यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली. खटल्याच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर संतोष माने हा जबाब देण्याच्या मानसिक स्थितीत नाही. त्यामुळे त्याचा जबाब घेण्याअगोदर त्याची वैद्यकीय तपासणी करावी, असा अर्ज अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयाकडे केला. या अर्जावर मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांना म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.  त्यानंतर न्यायालयाने मानेला न्यायालयीन कठडय़ात बोलवून प्रश्न विचारले.
शिक्षा दिली त्याला किती दिवस झाले, तुला कुठे ठेवले होते, सकाळी येताना चहा आणि नाश्ता घेतला का? असे अनेक प्रश्न न्यायाधीशांनी मानेला विचारले. त्यानंतर तुला शिक्षा सुनावल्यावर कसे वाटले, त्यावर मानेने ‘ दिलेली शिक्षा मान्य नसल्याचे सांगत शिक्षेमुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगितले.’ त्यानंतर बचाव पक्षाने न्यायाधीशांच्या प्रश्नावर आक्षेप घेतला. त्या वेळी अॅड. धनंजय माने आणि न्यायाशीश यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली. मला पत्नी सोनाली, मुलगी सई, प्रियंका, मुलगा भय्या आणि श्री हे भावासोबत भेटण्यासाठी आल्याचे मानेने न्यायालयास सांगितले. कारागृहात आठवडय़ातून वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याच बरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी गोळ्या दिल्या जातात, असे माने म्हणाला. यानंतर न्यायालयाने मानेवर कारागृहात केला जात असलेल्या उपचाराबाबतची कागदपत्रे १७ ऑक्टोबपर्यंत सादर करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले.
माणसे मारण्याची परवानगी दिली काय?
संतोष माने याला न्यायालयाकडून प्रश्न विचारले जात होते. त्या वेळी दिलेली शिक्षा मान्य नसल्याचे माने याने न्यायालयास सांगितले. त्या वेळी या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे वडील न्यायालयात उभे राहिले. ‘संतोष मानेला माणसे मारण्याची परवानगी दिली काय’ असा सवाल उपस्थित केला. त्या वेळी न्यायालयातील नागरिकांनी त्याला शांत बसविले.
कैद्यांना वेळेत हजर करा
कैद्यांना न्यायालयात हजर करण्यात उशीर होत असल्यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जातो. त्यामुळे कारागृहाने कैद्यांना वेळेत न्यायालयात हजर करावे, अन्यथा वाया गेलेल्या वेळेची कारागृहाकडून भरपाई घेतली जाईल, अशी नोटीस कारागृह प्रशासनाला न्यायालयाने काढली आहे.