पुणे : करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध म्हणून शहरात तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमुळे संसर्ग बाहेर पसरण्यास अटकाव होत असल्याचे टाळेबंदीच्या काळात दिसून आले, मात्र जसे टाळेबंदीचे नियम शिथिल होण्यास सुरुवात झाली, तसे हे चित्र बदलताना दिसत आहे. १ ते ११ जून या कालावधीत सापडलेल्या २३१२ नव्या रुग्णांपैकी तब्बल १०८३ रुग्ण हे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे असल्याचे महापालिके च्या अहवालातून दिसून आले आहे.

नऊ मार्चला शहरात पहिले करोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर राज्यातील सर्व भागांमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली, मात्र पुणे शहरातील रुग्णसंख्या ही सातत्याने अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे, असे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले. त्या परिसराचा बाहेरील परिसरांशी असलेला संपर्क  बंद करण्यात आला.

या दरम्यान म्हणजे ४ मे ते ११ मे या कालावधीत शहरात सापडलेल्या १६८१ रुग्णांपैकी १२५९ रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील होते, उर्वरित ४२२ रुग्ण प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील होते. १८ मे ते ३१ मे या काळात, म्हणजे टाळेबंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल के ल्यानंतर २९६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यांपैकी १६३७ रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील होते, मात्र त्याबाहेरच्या रुग्णांची संख्या वाढून ती १३२४ झालेली दिसून आली. १ ते ११ जून या कालावधीत मात्र २३१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यांपैकी १०८३ रुग्ण प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आहेत, तर उर्वरित १२२९ रुग्ण हे प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येच्या वाढीबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे महापालिके चे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ज्या परिसरात रुग्णवाढ दिसेल तो परिसर नव्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करणे, रुग्णवाढ आटोक्यात येईल तो परिसर खुला करणे असे धोरण आता महापालिके कडून स्वीकारण्यात आले आहे. लस किं वा औषध सापडेपर्यंत कदाचित हेच धोरण अंगीकारत करोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे हेच महत्त्वाचे आहे.

नागरिकांना आवाहन

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील रुग्णवाढ ही बाब गंभीर असून त्याबाबत नागरिकांनी सतर्क  राहणे अत्यावश्यक आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, कामासाठी घराबाहेर पडताना मुखपट्टी, वैयक्तिक स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियम पाळा. आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा, असे आवाहन पुणे महापालिके चे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले.

शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नव्याने प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबत शनिवारी आढावा घेण्यात आला असून त्यानुसार महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आदेश प्रसृत करतील.

– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त