परसबाग असे ठिकाण असते जिथे आपला जीव रमतो. चार घटका विरंगुळा म्हणून वेळ घालवता येतो. मातीत हात घालून आपण लावलेल्या झाडांची निगा राखता येते. मित्र-मैत्रिणी, स्नेही सगळ्यांनी बसून आनंद घेता येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभा धर्माधिकारीची गच्चीवरची बाग हे विरंगुळ्याचेच ठिकाण आहे. घरातील ओला कचरा घरचा घरात जिरावा, हा तिचा मुख्य हेतू होता. पण गच्चीवर बाग करताना फारसा खर्च करायचा नाही, हे ठरवून तिने छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा पुनर्वापर करायचे ठरवले. तीन टायर एकावर एक ठेवून, बाजूने फळ्या लावून एक जुनी पुली लावून आड तयार केला. त्यात सुंदर झाड लावलंय. सेंट्रीगच्या छोटय़ाछोटय़ा फळ्यांना स्वत:च पॉलिशचा एक हात देऊन त्या भिंतीवर ठोकल्या आहेत. त्याला स्पायडर प्लँट, फर्नसच्या कुंडय़ा अडकवून सजीव म्युरल केलं आहे. जुन्या पाईपचे तुकडे रंगवून ते आडवे अडवले आहेत. त्यात ताजा, करकरीत पालक तरारला आहे. इतकंच काय, पण हिच्या जावेचे मॅटर्निटी होम होते, त्यांच्याकडील जुन्या पाळण्यात माती भरून आता विभा झेंडू, पिटूनिया, बालसम अशा फुलांना जोजवत आहे. विभा एम.एस्सी. बॉटनी अन् नागपूरला प्रशस्त बंगल्यात वडिलांची नर्सरी असल्याने निसर्ग सहवास होता, पण लग्नानंतर हिने सौंदर्य विश्वात उडी घेऊन ब्युटीपार्लर सुरू केले. पण मनात हिरवा अंकुर होताच. एक दिवस माझी बाग बघून गेली अन् पुढच्या आठवडय़ात तिच्या गच्चीवर पालापाचोळा व उसाचे पाचट पसरलेला फोटो पाठवला. पत्र्याच्या पिंपात पाला, पाचट भरून त्यात पपई व केळी लावली. ही दोन्ही झाडं भरपूर कचरा खातात. त्यामुळे घरातल्या ओल्या कचऱ्याचा प्रश्न संपला. आता प्लास्टीक क्रेटमध्ये दोडका, वांगी, टोमॅटो लावले आहेत. पार्लरमध्ये व्ॉक्सचे पाच किलोचे डबे निघतात. त्यात पालापाचोळा भरून डब्यांवर पत्त्याच्या कॅटचे डिझाईन रंगवून शोभेची झाडं लावली आहेत. विभा सौंदर्यासक्त व कलाकार आहे. तिने जुने टॉवेल, तरट सिमेंटमध्ये बुडवून त्यापासून सुंदर प्लांटर तयार केले आहेत. मुले अमेरिकेहून आली अन् बिसलेरी बाटल्या साठल्या. वाळू व विटांच्या चुऱ्यात सिमेंट गालून त्यात या बाटल्या खोचल्या अन् वेगवेगळ्या फर्नस, पॉईनसेटीया यांनी एक सुबक कोपरा तयार झाला. सगळं करण्याची इच्छा होती, पण व्यापातून वेळ मिळेल का नाही वाटत होतं. पण जमतंय गं सगळं आणि मी इतकी रमून जाते इथे, विभाने सांगितले. आता घरचा पालक, पुदिना, टोमॅटोचा ज्यूस मी व अजित घेतो. ढोबळी, दोडकी ताजी भाजी काढताना सुद्धा आनंद मिळतो. विभाच्या बागेतील वस्तूंचा पुनर्वापर, त्यांची सौंदर्यपूर्ण मांडणी हे तिच्या बागेचे वैशिष्टय़ म्हणता येईल. तिच्याकडे सावलीतल्या झाडांचा भरपूर संग्रह होताच. पण गच्चीची जागा व ऊन वाया जातंय, असं वाटत होतं. आता त्याचा पुरेपूर वापर करून स्वत:च्या मेहनतीने सर्वाना रमायला आवडेल, अशी हिरवाई निर्माण केली आहे. गंधाली जाधव, प्रभात रोडवर राहते. तिच्या गच्चीवर जाण्यासाठी जीना चढतानाच तिच्यातील कलात्मक दृष्टीची जाणीव होते. जिन्यावर जुन्या पितळी गोष्टींची सुंदर मांडणी मनाला भावते. गंधालीने गच्चीवर शेरावुडचा देखणा शामियाना केला आहे. त्याला पांढरे झिरझिरीत पडदे लावले आहेत अन् त्याच्या आजूबाजूने लालबुंद सिल्व्हीया, कण्हेर, गुलाबाची रोपं, गवताचे शोभिवंत प्रकार लावले आहेत. खांबावर भिरभिरत्या जांभळ्या फुलांचा वेल. क्वचित आढळणारी दुहेरी रंगून क्रिपर यांची रंगांची उधळण आहे. वेगवेगळ्या उंचीवर ठेवलेल्या फुलांच्या कुंडय़ा, सायकलला अडकवलेल्या फुलपरडय़ा, छोटीशी घरटी सगळीकडे सौंदर्यपूर्ण रचना अन् नजाकत आहे. बोगनवेल, लसण्या वेल आहेत. पण खास आकर्षण म्हणजे द्राक्षांनी लगडलेली वेल! शिवाय पपई, केळी, पेरू, चिक्कू अशी फळझाडे. कलमी लिंबूही आहे. घरातील लोकांबरोबर मित्र मैत्रिणींबरोबर बसण्यासाठी स्नेहभोजन, पार्टीसाठी छानसं सीटआऊट असावं असं वाटत होतं. पण ते माती अन् रासायनिक खतांशिवाय करायचं होतं, असं गंधालीने सांगितलं. तिच्या घरी ओला कचरा खूप निघतो. वेगळ्या ठिकाणी कंपोस्ट करण्याऐवजी ती तो कुंडय़ांमध्येच जिरवते. शेराप्लायचे उरलेले तुकडे वापरून तिने चौकोनी बॉल्स केले आहेत. त्यात पालापाचोळा घालून आळू, पुदिना, वांगी, मिरची, टोमॅटो, बीन्स लावले आहे. बंगल्यात पाला खूप पडतो. तो साठवणे अवघड जाते म्हणून शेडर घेतला आहे. चुरा झालेला पाला कुंडय़ा भरायला मल्च करायला वापरते. या सगळ्यासाठी घरच्यांचे सहकार्य मिळते. मुलांवर हे संस्कार घडत आहेत. तिची मैत्रीण गौरी भिडे सातपुते हिने तीनशे लोकांच्या सोसायटीमध्ये गुरगावला कंपोस्ट प्रकल्प सुरू केला आहे. हे श्रेय गंधालीचेच. गंधाली आणि विभा दोघी बागेत स्वत: काम करतात. झाडांशी हितगूज करतात. कचऱ्याचा कलात्मक वापर करून दोघींनी आनंदमय निसर्ग परिसंस्था निर्माण केली आहे. म्हणूनच दोघींच्या बागा म्हणजे रमणीय सौंदर्यस्थळे आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creating the most amazing terrace garden
First published on: 22-11-2017 at 03:05 IST