एखादे बांधकाम पडून दुर्घटना घडल्यास संबंधित आर्किटेक्ट तसेच स्ट्रक्चरल इंजिनियरवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे; पण बिल्डरची नोंदणी महापालिकेकडे होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन यापुढे बिल्डरनाही महापालिकेकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्याच्या निर्णयाचे क्रेडाई पुणे मेट्रोने पाठिंबा दिला आहे.
बांधकाम व्यावसासियांकाना महापालिकेकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्याबाबत विचार सुरू असल्याचे निवेदन आयुक्त महेश पाठक यांनी गेल्या आठवडय़ात मुख्य सभेत केले होते. या संबंधी क्रेडाई पुणे मेट्रोने भूमिका स्पष्ट करणारे पत्रक प्रसिद्धीस दिले असून गृहप्रकल्पांमध्ये राहणाऱ्यांची तसेच हे प्रकल्प उभारताना त्यात काम करणाऱ्या मजुरांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यात कुठलीही तडजोड होता कामा नये. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी अनिवार्य करण्यासंदर्भात पुणे महापालिकेने पाऊल उचलले आहे, त्याला क्रेडाई पुणे मेट्रोचा पािठबा आहे. परंतु, त्यासाठी निष्पक्ष यंत्रणा उभारणे गरजेचे आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
यासंदर्भात तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीसाठी क्रेडाई महापालिकेला मदत करेल. बांधकाम प्रकल्पातील अपघात व त्याच्या बऱ्या-वाईट गुणवत्तेसाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला जबाबदार धरले जावे, याबाबत कोणतेही दुमत नसल्याचेही क्रेडाईने नमूद केले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम मजुरांना त्यांच्या सुरक्षेसाठी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात नियमितपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. बांधकाम प्रकल्पांवर सुरक्षेसाठी करावयाचे उपाय, त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी, कामाच्या गुणवत्तेसंदर्भातही संघटनेची नेहमीच आग्रही भूमिका असते. परंतु कितीही काळजी घेतली, तरी बांधकाम होत असताना काही अपघात टाळता येत नाहीत, असेही संघटनेचे म्हणणे आहे.