विशेष शिक्षण सेवा साहित्य आणि शाळा देणगी सदराखाली पैसे घेऊन ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून नूतन मराठी विद्यालयाच्या (लहान शाळा) मुख्याध्यापिका नंदा माने व शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील आर्थिक गैरकारभारांबाबत शाळेवर प्रशासक नियुक्त करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शासनाकडे परवानगी मागितली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या नूमवी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नंदा माने यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सहायक शिक्षण प्रमुख शिल्पकला कृष्णराज रंधवे (वय ३८, रा. देवाची आळंदी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २००७ ते २०१३ या काळामध्ये माने आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन मराठी विद्यालयाचे संस्थाचालक आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष शिक्षण सेवा साहित्य, शाळा देणगी या सदरातून ४५ लाख ३९ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला. त्याच बरोबर २००९ ते २०१३ या काळात शासकीय अनुदान घेऊन वेगवेगळ्या कारणांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक केली. या आरोपावरून त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ३४ आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेतील गैरव्यवहारांबाबत यापूर्वीही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन २००९ मध्ये शाळेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने शाळा व्यवस्थापनाला दोषी ठरवून विविध मार्गाने एकूण ७६ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा अहवाल दिला होता. ही रक्कम शाळा समिती आणि मुख्याध्यापिका नंदा माने यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी शिफारसही या समितीने केली होती. शिक्षण प्रसारक मंडळी व शाळा समितीला अनेक वेळा नोटीस पाठवूनही त्याबाबत काहीही कार्यवाही न झाल्यामुळे माने व इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत. शाळेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे शाळेवर प्रशासक नेमण्यासाठी शिक्षण संचालनालयाने शासनाकडे परवानगी मागितली आहे.