वीस कोटी रूपयांची खंडणीची मागणी व फसवणूक प्रकरणाचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी आरोपींनी केली होती. त्यानंतर संजीव दयाळ यांनी हा तपास सीआयडीकडे सोपवून पुणे पोलिसांना ही एकप्रकारे चपराक मारली आहे.
सुभाष बाबुराव सणस (वय ५९, रा. शुक्रवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक योगेश भोजराज पोरवाल, पीयूष भोजराज पोरवाल (रा. मुकुंदनगर) सुनील सुमतिलाल मुथा, सिद्धार्थ सुनील मुथा (रा. साठे कॉलनी, शुक्रवार पेठ), भोमराज चंदनमल पोरवाल, हेमंत पंचमिया (रा. गणेशखिंड रस्ता) यांच्या विरुद्ध खंडणी व फसवणुकीचा २३ मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ात सुरूवातीस तिघांना अटक केली असता त्यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. तात्पुरत्या जामिनाची मुदत संपल्यानंतर कायमचा जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली असता त्यांना जामीन मंजूर केला. आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून काढून दुसरीकडे देण्याची मागणी दयाळ यांच्याकडे केली होती. त्यांनी सुरूवातीस हा तपास आर्थिक शाखेकडे दिला, पण आरोपींनी त्यावरही अक्षेप घेत हा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली. त्यानुसार संजीव दयाळ यांनी हा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी, अशा प्रकारचा कोणताही आदेश आम्हाला आलेला नाही. या विषयावर मी अधिक बोलणे योग्य नसल्याचे सांगत या प्रकरणावर बोलणे टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
वीस कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्य़ाचा तपास सीआयडीकडे
वीस कोटी रूपयांची खंडणीची मागणी व फसवणूक प्रकरणाचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला आहे.
First published on: 20-04-2013 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime of investigation of demand ransom of 20 cr now by cid