जिल्हा व परिसरात प्रचंड दहशत माजविणारा कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला. लोंढे पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडला असताना उरुळी कांचन येथील शिंदावणे रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अप्पा लोंढे याची बारामती, दौेंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्य़ांमध्ये त्याला शिक्षा झाली होती व सध्या जो जामिनीवर बाहेर होता. राजकीय मंडळींशीही त्याचे संबंध होते. २००२ मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. त्यानंतर आता लोंढे याचाही खून झाला.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे हा दररोज पहाटे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडत असत. त्यानुसार गुरुवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास तो चालण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर शिंदावणे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या छातीत व पोटात शिरल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी त्याचा मुलगा वैभव प्रकाश लोंढे (वय २२) याने फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू पवार, सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली. या घटनेनंतर घटनास्थळी व उरुळी कांचन भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून या खुनाच्या वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहिल्या जात असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2015 रोजी प्रकाशित
कुख्यात गुंड अप्पा लोंढे याचा गोळ्या घालून खून
कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला.

First published on: 29-05-2015 at 03:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime police appa londhe murder