मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याच्या सहभागामुळे चर्चेत आलेला येरवडा कारागृहातील कैद्यांचा गुरुवारी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती नसल्याने या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी कार्यक्रमस्थळी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यात पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
कारागृह विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी दुपारी कार्यक्रमाच्या तीन तास आधी तातडीने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. सुरक्षेचे कारण नेमके कोणते आहे, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. या कार्यक्रमासाठी तिकीट काढलेल्या प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कैद्यांच्या कल्याणनिधीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील हे उपस्थित राहणार होते. संजय दत्तच्या सहभागामुळे या कार्यक्रमाची काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती.
दरम्यान, संजय दत्तच्या सहभागामुळे या कार्यक्रमाच्या विरोधात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरावर दुपारी तीनच्या सुमारास मोर्चा काढून निदर्शने केली. तोवर हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची कल्पना कार्यकर्त्यांना नव्हती. आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांना विरोध केला. पोलिसांनी समजून काढल्यानंतर कार्यकर्ते तेथून जाऊ लागले. मात्र, काही अंतरावर जाऊन त्यातील काहींनी संजय दत्तचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी झालेल्या गोंधळात लाठीमार करण्यात आला. या लाठीमाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पुन्हा बालगंधर्व चौकीसमोर धरणे धरले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
संजय दत्तच्या सहभागाचा कैद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलला
संजय दत्तच्या सहभागामुळे या कार्यक्रमाच्या विरोधात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरावर दुपारी तीनच्या सुमारास मोर्चा काढून निदर्शने केली.

First published on: 27-09-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural programme of sanjay dutt and other prisoners are postponed