जात, पात, पंथ, पक्ष यापेक्षा उत्तृंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे असून ते स्वीकारावेच लागतील, असे मत राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी निगडी प्राधिकरणात बोलताना व्यक्त केले.
सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. किशोर शहा, सदाशिव रिकामे, एस. बी. पाटील, मिलिंद देशपांडे, मारुती भापकर, महेश कुलकर्णी, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते.
इदाते म्हणाले, सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला. आता सामाजिक समरसता व एकात्मतेची भावना वाढीस लागली असून हे सर्व चांगले बदल बाबासाहेबांच्या लढय़ाचे प्रतीक आहेत. लहुजी वस्तादांच्या आखाडय़ात लोकमान्य टिळक, वासुदेव फडके, महात्मा फुले जात असत. या तीन व्यक्ती म्हणजे तीन प्रवाह होते, त्यांची प्रेरणा लहुजी वस्ताद होते. सामाजिक चळवळ महात्मा फुलेंपासून सुरू होते. तर, समरसतेचा दुसरा प्रवाह बाबासाहेबांच्या ‘बहिष्कृत भारत’ पासून सुरू होतो. एकात्मतेसाठी भाषावार प्रांतरचनेला विरोध करून संस्कृत ही राष्ट्रभाषा करण्याचा आग्रह त्यांनी धरला. प्रास्तविक प्रदीप पाटील यांनी केले. भास्कर रिकामे यांनी आभार मानले.