पुण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा ३९ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरासाठी असलेले पवना धरण निम्म्याहून अधिक भरले आहे. तेथील पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास पाणीसाठय़ात चांगली वाढ होईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धरणांच्या क्षेत्रात जून महिन्याच्या अखेरीपासून पावसाने मोठी उघडीप दिली. पावसाने जवळजवळ महिनाभर दडी मारली होती. त्यामुळे आठ-दहा दिवसांपर्यंत धरणांमधील पाणीसाठा २५ टक्क्य़ांच्याही खाली होता. गेल्या आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांचा साठा ३९ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. पुण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांच्या क्षेत्रात एकूण ११.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ३९.०६ इतकी आहे. खडकवासला धरण ३४ टक्के भरले आहे. याशिवाय पानशेत धरणात ५२ टक्के, वरसगाव धरणात ३३ टक्के तर टेमघर धरणात २० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. पिंपरी-चिंचवडसाठीच्या पवना धरणात ५०.२४ टक्के पाणी आहे.

धरणांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे (टीएमसीमध्ये, तर पाऊस मिलिमीटरमध्ये) :
धरणाचे नाव        १ जूनपासूनचा पाऊस     धरणाचा पाणीसाठा        टक्केवारी
खडकवासला          ३४५                              ०.६८                           ३४.३२
पानशेत                  ९३९                               ५.६०                          ५२.५९
वरसगाव                ९४१                               ४.३४                          ३३.८८
टेमघर                  १२३६                               ०.७६                           २०.६५
एकूण                      —                                  ११.३९                        ३९.०६