केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर, माणसाच्या आचरणाविषयी सर्वकाही सांगणारा समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध हा ग्रंथ आता श्राव्य माध्यमातून येत असून त्यासाठी प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा स्वर लाभला आहे. हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशातून राज्य मराठी विकास संस्थेने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.
मध्ययुगातील संतांचे वाङ्मय हा मराठी साहित्याचा अजरामर सांस्कृतिक ठेवा आहे. दासबोध हा ग्रंथ आजही अनेकांच्या नित्यपठणामध्ये आहे. यामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे तत्त्वज्ञानच नव्हे तर, व्यासंग, निरीक्षणातील बारकावे, समकालीन परिस्थितीचे भान अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडते. वीस अध्याय असलेला हा ग्रंथ श्राव्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. संगीत मरतड पं. जसराज यांचे शिष्य आणि मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये दासबोधाचे श्लोक ऐकता येणार असून त्याला राहुल रानडे यांनी स्वरसाज दिला आहे. एकूण ५० तासांच्या ध्वनिमुद्रणामध्ये ७ हजार ८०० श्लोक समाविष्ट आहेत.
या विषयी संजीव अभ्यंकर म्हणाले, दासबोध प्रकल्पासाठी काम करताना रामदास स्वामींचे विचार पोहोचविण्यासाठी माझा स्वर हे माध्यम आहे हे सर्वप्रथम ध्यानामध्ये घेतले. माझ्यासाठी हे शब्दप्रधान गायकीचे माध्यम आहे. स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार याला अधिक महत्त्व असल्यानेच माझी निवड झाली असावी असे मी समजतो. गेल्या वर्षी एप्रिलला या प्रकल्पाची सुरुवात झाली. नऊ महिन्यांमध्ये ८० दिवसांचे ध्वनिमुद्रण झाले असून त्यासाठी मी १२५ तास गायन केले आहे. प्रत्येक अध्याय समजून घेतला. उच्चारांच्या स्पष्टतेसाठी मराठीचे प्राध्यापक गोिवद काळे यांचे मार्गदर्शन लाभले. दासबोध या ग्रंथामध्ये न समजण्यासारखे काही नाही. त्यातील विचार आचरणामध्ये आणणे हेच अवघड आहे.
गाताना केवळ श्लोक म्हणणे अभिप्रेत होते. शब्दांना न्याय देणारे गायन महत्त्वाचे. त्यामुळे आहे तसेच सोपे ठेवायचे. त्यासाठी चाल करायची नाही. केवळ गाण्यासाठी जी स्वरावली लागते तेवढीच स्वररचना केली आहे. दासबोध हा माझा अत्यंत आवडता आणि आनंदाचा विषय आहे. हा ग्रंथ मी यापूर्वीही वाचला असल्यामुळे श्लोकगायन करताना मी पूर्णपणे न्याय देऊ शकलो. समर्थानी मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत. समाजात तशी माणसे आपल्याला दिसतात. किंवा कधी कधी आपणही तसेच वागतो. हे ध्यानात आल्यानंतर गाताना अनेकदा हसायचो, असेही संजीव अभ्यंकर यांनी सांगितले. डॉन स्टुडिओच्या अर्चना म्हसवडे यांनी ध्वनिमुद्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्य मराठी विकास परिषदेच्या
१े५२.ेंँं१ं२ँ३१ं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरून दासबोध डाऊनलोड करता येईल, त्याचप्रमाणे हा ग्रंथ भविष्यात ऑडिओबुकच्या माध्यमातूनही रसिकांच्या भेटीला येणार आहे.