मगरपट्टा येथे सुरू असलेले गॅस वाहिनीचे काम धोकादायक असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणासाठी या वाहिनीचा मार्ग बदलावा, असे पत्र महापालिकेच्या विद्युत विभागाने पथ विभागाला दिले आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी हे पत्र संबंधित विभागाला दिले आहे. मगरपट्टा परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस या कंपनीकडून गॅसची वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून या कामाबाबत तक्रारी आल्या आहेत. साडेसतरा नळी, एमएसईबी स्वीचिंग स्टेशन ते रेल्वे पुलापर्यंतच्या रस्त्यालगत उच्च क्षमता विद्युत केबल टाकण्यात आलेली आहे. या भागातील अनेक कंपन्या व शासकीय कार्यालये यांचा विद्युत पुरवठा या केबलवर अवलंबून आहे. मात्र, या केबलच्याच परिसरात खोदाई करून केबलच्या वरून गॅसची वाहिनी टाकण्याचे काम येथे केले जात आहे, ही बाब कंदुल यांनी निदर्शनास आणून दिली आहे. येथे ज्या जमिनीखालून पाईपमधून केबल नेण्यात आली आहे त्याच पाईपवरून गॅस वाहणारे पाईप टाकण्यात आले आहेत.
या गॅस वाहिनीमुळे केबलचे काम करण्यास तसेच देखभाल-दुरुस्तीस अडचण येऊ शकते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उच्चदाब वीज वाहिनीपासून नियमाप्रमाणे ठराविक अंतर सोडूनच गॅसची वाहिनी टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे या गॅस वाहिनीचा मार्ग बदलावा, असेही या पत्रातून पथ विभागाला कळवण्यात आले आहे. या दोन्ही वाहिन्या भूमिगत असून त्या एकत्र आल्यास भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.