पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर ‘मंकला’ नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले आहेत. नाशिकचे अभ्यासक सोज्वल साळी यांना हे खडकांवरील पटखेळ सापडले आहेत. प्राचीन काळात खडकांवर मनोरंजनासाठी पटखेळ कोरले गेले आहेत. आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत. त्यानंतर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर ४१ पटखेळांचा शोध लागला होता. आता कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर ‘मंकला’ या खेळाचे ३५ पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे दिसून येत आहे. या कामी साळी यांना अमीत नेवासे, चंद्रशेखर पिलाने यांचे सहकार्य मिळाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

   कापूरहोळ येथे सापडलेल्या पटखेळांविषयी साळी म्हणाले, की कापूरहोळ येथे सापडलेल्या सर्व खेळांचे दस्तावेजीकरण करण्यात आले. त्यात ‘मंकला’ या मुख्य खेळाचे उपप्रकार असल्याचे दिसून आले. मंकलाचा एक उपप्रकार केनियामध्ये ‘अजुआ’ या नावाने खेळला जात होता. तर, ‘अळीगुळीमाने’ हा खेळ आजही भारतातील कन्नड भागात खेळला जातो. कापूरहोळ येथील खडकांवर वेगवेगळी चिन्हे, आकृत्याही आहेत. त्यामुळे त्यांचाही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे. खडकांवर खड्डे असलेल्या मंकला या खेळाचे विविध प्रकार जगभरातील विविध देशांमध्ये खेळले जात असल्याचे पुरावे मिळतात. त्याबाबत आतापर्यंत संशोधनेही झाली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery ancient games pune satara highway ancient game ancient times entertainment ysh
First published on: 29-04-2022 at 00:14 IST