चर्चासत्रात प्रवासी-प्रशासनाचे एकमत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमपी आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांशी नागरिकांचा नियमितपणे संपर्क येतो. यंत्रणेतील सगळेच कर्मचारी सरसकट वाईट नाहीत, मात्र या यंत्रणांकडून नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत शनिवारी व्यक्त करण्यात आले.

मध्यरात्रीच्या सुमारास हणमंत पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची पीएमपीचे चालक, वाहक आणि पोलिसांकडून अडवणूक करण्याची घटना ताजी असतानाच सजग नागरिक मंच प्रणित पीएमपी प्रवासी मंचतर्फे ‘पीएमपी व पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, महाव्यवस्थापक विलास बांदल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, हणमंत पवार, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी उपस्थित होते.

हणमंत पवार म्हणाले,की पीएमपी बसमध्ये महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसलेल्या पुरुषांना विनंती करुनही त्यांनी पत्नी आणि लहान मुलीला बसण्यासाठी जागा दिली नाही. त्या वेळी वाहकाने आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही. पोलिसांकडे दाद मागितली असता त्यांनीदेखील हद्दीचा वाद घालून मनस्ताप दिला. सामान्य प्रवाशांना सेवा देण्यासाठी आपण व्यवस्थेचे भाग आहोत याचा कर्मचाऱ्यांना विसर पडत आहे.  ग्राहक म्हणून आपल्या हक्कासाठी लढा देणार आहे.

विलास बांदल म्हणाले, की चालक आणि वाहकांची प्रवाशांशी वर्तणूक चांगली नसल्याचे अनेक अनुभव कानावर पडतात. हे चित्र बदलण्यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण देणे, निलंबन, बडतर्फी, बदली या प्रकारची कारवाई करण्याची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षा अधिकाधिक कठोर करण्याच्या दृष्टीनेही प्रशासन गंभीर आहे. विष्णू जगताप म्हणाले, कायद्यासाठी माणसे नसून माणसांसाठी कायदा आहे हे सर्वानी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, पीएमपीचे सर्वच कर्मचारी वाईट नाहीत, मात्र जे आपले कर्तव्य विसरतात त्यांना समज देण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासन, नागरिक, प्रवासी मंच आणि कर्मचाऱ्यांचा समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेता नियोजित गाडय़ांच्या खरेदीमध्ये सीएनजी आणि विजेवर चालणाऱ्या बस खरेदी केल्या जाणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion session over pmp and police administration sensitivity
First published on: 20-05-2018 at 03:26 IST