पिंपरी पालिका शिक्षण मंडळात बनावट बूट वाटपावरून उडालेला गोंधळ, त्यातून बाहेर आलेले टक्केवारीचे राजकारण, मंडळाच्या बदनामीने गाठलेला कळस या घडामोडींनंतर ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा घेतला. तथापि, मुदत संपल्याने राजीनामा घेण्यात आला असून ठेकेदार व सदस्यांमध्ये झालेल्या वादंगाचा राजीनाम्याशी संबंध नसल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.
अजितदादा, आमदार विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांचे भक्कम पाठबळ लाभल्याने मुदत संपल्यानंतर तीन महिने लोखंडे पदावर कायम होते. ‘बाटा’ कंपनीचे बनावट बूटवाटप प्रकरण उघड झाले, त्यात ठेकेदाराने सगळे अर्थकारण उघड केले. याशिवाय, सभापतींच्या मनमानीमुळे सर्व सदस्य एकीकडे व सभापती दुसरीकडे, असे चित्र पुढे आले. शिक्षण मंडळाची कामे होत नाहीत, त्याला आयुक्तांची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे खापर त्यांनी फोडले. या सगळ्या घडामोडीत कधी नव्हे इतकी मंडळाची बदनामी झाली. शिक्षकदिनापासून खप्पा मर्जी झालेल्या अजितदादांनी लोखंडे यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार, पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे यापूर्वीच देण्यात आलेला राजीनामा मंगळवारी महापौरांकडे देण्यात आला. वर्षभरातील कामगिरीचा सविस्तर आढावा लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत घेतला. अजितदादांनी संधी दिली, सर्वाचे सहकार्य लाभले. वर्षभरात भरपूर कामे करू शकलो, यामुळे समाधानी आहे. मंडळासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग असावा. स्वच्छतेच्या विषयावरून आम्हाला टीका सहन करावी लागली. मात्र, तो विषय आमच्याकडे नसून माध्यमिककडे आहे, असे ते म्हणाले.
१७ ऑक्टोबरला निवडणूक
शिक्षण मंडळाच्या नवीन सभापती व उपसभापतपिंदासाठी १७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता निवडणूक होणार आहे. दोन्ही पदांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येणार असून अजितदादांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे महापौर मोहिनी लांडे व पक्षनेत्या मंगला कदम यांनी सांगितले.