कात्रज येथील टेकडय़ा फोडल्याने गेल्या आठवडय़ातील दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे व महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्याचा आदेश अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिला. त्याचबरोबर थेट महामार्गावर बेकायदेशीररीत्या रस्ता आणणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना ही माहिती दिली. कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ पुणे-सातारा रस्त्यावर गेल्या आठवडय़ात पाण्याचे प्रचंड लोट आल्यामुळे अनेक वाहने वाहून गेली होती. त्यात एक महिला मृत्युमुखी पडली, तर तिची १४ महिन्यांची बालिका अद्याप बेपत्ता आहे. या पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी महसूल विभागातील अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित इतर अधिकाऱ्य़ांची बैठक घेतली. त्यात अनेक निर्णय घेण्यात आले.
या घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश प्रांतांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. कात्रजच्या बोगद्याजवळ शिंदेवाडी येथे बेकायदेशीरपणे टेकडय़ा फोडण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर रस्ते व प्लॉट तयार करण्यात आले आहेत. या गोष्टींसाठी प्रशासनाने ५६ लाख रुपये व साडेबारा लाख रुपयांचा दंडही केलेला आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर या बेकायदेशीर गोष्टींमुळे सार्वजनिक उपद्रव होत असल्याच्या कलमाखाली (सीआरपीसी १३३) कारवाई करून हे काम बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
शिंदेवाडी येथील टाटा मोटर्सचे बेकायदशीर बांधकाम काढण्याबाबतही नोटीस काढण्यात आली आहे. याचबरोबर महामार्गावर ठिकठिकाणी खासगी लोकांकडून थेट त्यांचे खासगी रस्ते येत आहेत. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही. अशा बेकायदेशीर कामांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
‘जुने प्रवाह व मोऱ्या पूर्ववत करा’
रस्त्यांच्या कामांसाठी त्या भागातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आले आहेत. हे सारे प्रवाह पहिल्यासारखे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी आवश्यक ते बदल करावेत व सुधारित आराखडा सादर करावा. त्यानुसारच पुढील कामे करावीत, असे आदेशही प्राधिकरणाला देण्यात आले आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
वाहून गेलेली मुलगी बेपत्ताच
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीजवळ पाण्याच्या प्रवाहात मोटारीतून वाहून गेलेल्या चौदा महिन्यांच्या संस्कृती वाडेकर हिचा चौथ्या दिवशीही शोध लागला नाही. सोमवारी दिवसभर वीस पोलिसांच्या पथकाने श्वानाच्या मदतीने शोध घेतला, पण ती सापडली नाही. नवीन कात्रज बोगदा परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे शिंदेवाडीजवळ अल्टो मोटारीतून विशाखा वाडेकर व त्यांची दीड वर्षांची मुलगी संस्कृती पाण्यात वाहून गेले होते. विशाखा यांचा मृतदेह नागरिकांना सापडला. पण, गेल्या चार दिवसांपासून संस्कृतीचा शोध पोलीस, संस्कृतीचे नातेवाईक, स्थानिक नागरिक घेत आहेत. सोमवारी दिवसभर वीस पोलिसांच्या पथकाने घटनेपासूनच्या पाच किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला, पण ती सापडली नाही, अशी माहिती राजगड पोलिसांनी दिली.