राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांची तंबी

निवडणुकीदरम्यान दिवसा एक आणि रात्री एक, असा प्रचार करायचा नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही मॅचफिक्सिंग करायचे नाही, अशी तंबी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी चिंचवड येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना दिली. पिंपरीतील राजकारणाची इत्थंभूत माहिती आणि स्वपक्षातील कार्यकर्त्यांची जुनी खोड माहिती असल्याने अजितदादांनी हे सूचक विधान केल्याचे मानले जाते.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी सभापती दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजप खोटारडे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर सातत्याने टीका केली. मात्र, आता ते मोदींचा उदो-उदो करत आहेत.

भाजपसोबत राहिल्याने शिवसेना सडल्याचे ते सांगत होते. आता मात्र ते भाजपला चिकटले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर राममंदिराची आठवण यांना झाली, पाच वर्षे ते झोपले होते का. वडिलांचे स्मारक ते बांधू शकले नाहीत, त्यासाठी धमक लागते. कोणाही येरागबाळ्याचे ते काम नाही, अशी टीका पवारांनी ठाकरे यांना उद्देशून केली.

नातवाच्या विजयासाठी आजोबांचे साकडे

पार्थ पवार यांना विजयी करण्याचे साकडे पार्थचे वडील अजित पवार तसेच आजोबा शरद पवार यांनी या वेळी घातले. नव्या नेतृत्वाची फळी उभी करायची आहे. आपण थांबलो असलो तरी राज्यसभेत आहोत, असे पवार म्हणाले. तर, बापाला पोरासाठी मते मागावी लागत आहेत, अशी टिप्पणी अजितदादांनी गमतीने केली.