पहिली पत्नी असताना एका महिलेशी दुसरा विवाह करून त्या महिलेची फसवणूक करणाऱ्या एका डॉक्टरला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आशिष मिनाशे (वय ३६, धनकवडी) असे या डॉक्टरचे नाव आहे. मिनाशे हा भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये एका मोठय़ा डॉक्टरचा मदतनीस म्हणून २०१२ पूर्वी काम करत होता. त्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या एका महिलेशी मिनाशे याची ओळख झाली. या महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते व तिला दोन अपत्यंही आहेत. मिनाशे याने या महिलेशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. दोघांचा दूरध्वनीवर संपर्क होऊ लागला. त्यानंतर मिनाशे याचे या महिलेच्या घरीही येणे-जाणे होऊ लागले.
मिनाशे याने या महिलेशी मे २०१२ मध्ये विवाह केला. मिनाशे याचा पूर्वी विवाह झाल्याचे या महिलेला माहिती नव्हते. मिनाशे हा पहिल्या पत्नीसोबत राहत नसला, तरी त्याने तिला कायदेशीर काडीमोड दिलेला नाही. दुसऱ्या महिलेशी विवाह केल्यानंतर काही दिवसांनी या महिलेकडून मिनाशे याने साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर तिसऱ्याच एका महिलेसोबत तो फिरू लागला. त्याचा पहिला विवाह झाला असतानाही दुसरा विवाह करून नंतर तिसऱ्याच महिलेशी संबंध जोडण्याचा त्याचा प्रयत्न लक्षात आल्यानंतर दुसरा विवाह केलेल्या संबंधित महिलेने याबाबत सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली. त्याने घेतलेले साडेतीन लाख रुपये परत देण्याची मागणीही महिलेने केली, मात्र त्यास त्याने नकार दिला.
पोलिसांनी संबंधित महिलेची तक्रार दाखल करून घेत मिनाशे याला शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.