खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूला साचलेला गाळ काढून धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढविण्याचे अनोखे अभियान ‘ग्रीन थम्ब’ आणि ‘त्रिशक्ती फाऊंडेशन’ या संस्थांतर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी पुणेकरांनीही श्रमदान करून सहकार्य करावे, असे आवाहन या संस्थांतर्फे करण्यात आले आहे.
खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूस वर्षांनुवर्षे गाळ साचत आला आहे. हा परिसर साधारण २२ किलोमीटर एवढा आहे. काढलेल्या गाळाचा वापर झाडे लावण्यासाठी आणि शेतीसाठी करण्यात येत आहे, अशी माहिती त्रिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष कर्नल (नि.) संभाजी पाटील यांनी दिली. धरणाच्या कडेने ५० लाख झाडे लावून वृंदावन विकसित करण्याचा या संस्थांचा मानस आहे. संपूर्ण गाळ जर काढून त्याचा वापर वृक्षलागवडीसाठी केला तर जलसाठा आणि भूजलसाठय़ामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी गाळ काढण्यासाठी श्रमदान करून चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांनी केले आहे.
अभियानाच्या प्राथमिक फेरीमध्ये एक किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच धरणालगत १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे धरणामध्ये ५ कोटी लिटर पाणी जास्त साठणार आहे. अशाप्रकारे २२ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यास एकशे दहा कोटी लिटर पाणी साठवता येईल.                                          धरणाच्या बाजूला गाळ नाही असे सिंचन खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे गाळ आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी ग्रीन थम्बतर्फे करण्यात आली आहे.