पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी डंपरखाली चिरडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील फुगेवाडी आणि दापोडीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली हा अपघात झाला. यामध्ये आसाराम कांबळे (वय ६७) यांचा मृत्यू झाला. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. पुलाखालील रस्ता खराब झाल्याने याठिकाणी महापालिकेतर्फे डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी येथे खडी आणून टाकली जात होती. यावेळी आसाराम कांबळे उड्डाणपुलाखाली झोपले होते.  एम. एच.१४ बी.टी. ३१६८ हा डंपर याठिकाणी खडी आणून टाकण्याचे काम करत होता. खडी टाकून झाल्यानंतर डंपर मागे घेताना चालकाला मागच्या बाजूला आसाराम कांबळे झोपल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे डंपर थेट आसाराम कांबळे यांच्या अंगावर गेला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालकाला दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.