न्यूझीलंडमधील शिक्षणसंस्था आता भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सरसावल्या असून न्यूझीलंडमधील शिक्षणसंस्थांच्या ‘एज्युकेशन न्यूझीलंड’ या फोरमतर्फे शनिवारी ‘एज्युकेशन फेअर’ चे आयोजन करण्यात आले होते.
या फेअरमध्ये न्यूझीलंडमधील शिक्षणसंस्थांनी सहभाग घेतला होता. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मल्टीमिडिया, बायोटेक्नॉलॉजी अशा विविध विषयांमध्ये न्यूझीलंडमध्ये असलेल्या शैक्षणिक संधींची माहिती देण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन स्तरावर प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी एज्युकेशन न्यूझीलंडचे प्रमुख ग्रँट मॅकफर्सन यांनी सांगितले, ‘‘न्यूझीलंड एज्युकेशन फेअरमुळे भारत आणि न्यूझीलंडमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ होतील. न्यूझीलंडमध्ये आम्ही अनेक नवे अभ्यासक्रम चालवत आहोत. उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या काही वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’’ आतापर्यंत एज्युकेशन न्यूझीलंडतर्फे यापूर्वी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोचिन या ठिकाणीही अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.