scorecardresearch

पुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनचालकांना प्रवेश बंदी

पादचाऱ्यांना अडथळा मुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या पादचारी दिन उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला आहे.

पुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनचालकांना प्रवेश बंदी

पादचाऱ्यांना अडथळा मुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या पादचारी दिन उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारी लक्ष्मी रस्त्यासह शहरातील २१ मार्गांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी वाॅकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. त्यानुसार महापालिकेकडून दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी पादचारी दिन उपक्रम राबविला जातो. गेल्या वर्षी लक्ष्मी रस्ता अर्धा दिवस वाहनमुक्त करून पादचारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाषाण-सूस रस्ता, औंध ट्रॅफिक पार्क येथे पादचारी अनुकूल प्रकल्प सुरू करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाची व्याप्ती पथ विभागाकडून वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत

लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती), लाल बहादूर शास्त्री रस्ता, बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय), सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल), वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक), लुल्लानगर ते गंगाधाम चौक, हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल), सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर), जंगली महाराज रस्ता, पाषाण-सूस रस्ता, मयूर कॉलनी, सिटी प्राइड थिएटर कोथरूड, कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक, पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी), खराडी दक्षिण मुख्य रस्ता, ५०९ चौक ते विश्रांतवाडी आणि बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रम राबविला जाणार आहे.

हेही वाचा >>>राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा

पादचाऱ्यांना मुक्तपणे संचार करता यावा, वाहनांमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी व्हावे तसेच पादचारी मार्ग, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्राॅसिंगसह अन्य पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. वाहनांचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठीही या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. पादचाऱ्यांना या उपक्रमामुळे विना अडथळा मार्गक्रमण करता येणार असून पुस्तिकेचे लोकार्पण, शालेय प्रवास सुधार योजनेअंतर्गत रस्त्यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. शाळांसाठी केलेल्या वाहतूक आराखड्याचीही चाचणी खराडी, डेक्कन आणि पर्वती विभागातील काही शाळांमध्ये करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:02 IST

संबंधित बातम्या