राज्य शासनाच्या निर्णयानुसार पंधरा वर्षे जुन्या असणाऱ्या वाहनांना पर्यावरण कर लागू करण्यात आला आहे. मात्र, वाहनांची तांत्रिक तपासणी करून हा कर वाहन मालकांकडून भरला जात नसल्याने अशा दुचाकी व खासगी मोटारींवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रविवारी कारवाई सुरू केली. या मोहिमेत २२०० वाहनांची तपासणी करून त्यातील ४१० दुचाकी व २१ मोटारी जप्त करण्यात आल्या.
शासनाच्या ऑक्टोबर २०१० मधील अधिसूचनेनुसार पंधरा वर्षे जुन्या असणाऱ्या वाहनांसाठी पर्यावरण कर भरावा लागतो. त्यासाठी संबंधित वाहनांची तांत्रिक तपासणी करून पुनर्नोदणी करून घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही प्रक्रिया न करता ही जुनी वाहने मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे या वाहनांचे विमा प्रमाणपत्रही नसते. त्यामुळे या वाहनांवरील कारवाईसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी आरटीओकडून शहराच्या विविध भागांमध्ये २४ भरारी पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी २२०० वाहनांची तपासणी करून कारवाई केली.
कारवाईच्या पहिल्याच दिवशी वाहन मालकांकडून ८५ हजार ८०० रुपयांचा दंड व एक लाख २३ हजार ८०० रुपयांचा पर्यावरण कर वसूल करण्यात आला. पंधरा वर्षे जुन्या असलेल्या वाहनांच्या मालकांनी पर्यावरण कर त्वरित भरावा व वाहनांची पुनर्नोदणी करून घ्यावी. अन्यथा अशी वाहने जप्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment tax for 15 year old two and four wheeler vehicles
First published on: 19-10-2015 at 03:26 IST