पुणे : पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वर आणि परिसरात रोगराई पसरण्याचे कारण ठरत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होऊन अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड अशा आजारांची लागण होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राच्या (सीएसडी) माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन’ संशोधन प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत महाबळेश्वर येथे संशोधन करण्यात आले. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पात निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांचा समावेश होता. महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या विकारांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने अभ्यास केल्यावर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळली जात असल्याचे, पाण्याच्या माध्यमातून ती नागरिकांच्या पोटात जाऊन आजार होत असल्याचे दिसून आले. संशोधन प्रकल्पात महाबळेश्वर, पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना आणि भूजल यांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. त्यात पिण्याच्या पाणी, भूजल नमुन्यांमध्ये उच्च प्रमाणात प्रदूषण दिसून आले. त्यानंतर या प्रदूषणाचा उगम शोधण्यास सुरुवात केली असता घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा, वेण्णा तलावानजीक उभ्या असलेल्या घोड्यांची विष्ठाही पाण्यात मिसळली जात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाइपलाइनलगत घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा आढळतो. घोड्यांच्या विष्ठेमध्ये इतर प्रदूषणाव्यतिरिक्त विषाणू आणि जीवाणू असल्याने पाणी दूषित होऊन ते आजारांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले. डॉ. मस्तकार म्हणाल्या, की या अभ्यासानंतर सुचवलेल्या उपाययोजनांचे पुढे काय झाले, पाण्याची गुणवत्ता सुधारली का, या अनुषंगाने पुढेही अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाद्वारे घोड्यांच्या मालकांशी चर्चा करून उपाययोजना राबवण्याचे नियोजन आहे. उपाययोजना काय? पाण्याच्या स्रोतापासून प्रदूषण करणारे घटक वेगळे करणे. वेण्णा तलावापासून घोडे उभे राहण्याची जागा दूर नेणे. घोड्यांची विष्ठा संकलित करून बायोगॅस आणि वीजनिर्मिती करणे. व्यापारी आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे. हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘वॉर रूम’ कागदावरच! प्रशासनाकडून दखल गोखले संस्थेच्या अभ्यासाची दखल प्रशासनाने घेतली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. वेण्णा तलावानजीक असलेली दुकाने हटवण्यात आली आहेत. पाणी प्रक्रिया प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे डॉ. मस्तकार यांनी सांगितले.