वीज जोडणीसाठी लाच घेताना महावितरणचे कार्यकारी अभियंता भानुदास भगवंत भोसले (वय ५६) आणि उप कार्यकारी अभियंता प्रशांत दत्तात्रय पराते (वय ४७) या दोघांसह चौघांना लाच घेताना बुधवारी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे महावितरणच्या धनकवडी विभागात दोन ठिकाणी सर्व काळजी घेत एका तासाच्या अंतराने दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
 सदाशिव चंदर सरपाले (वय ५४, रा. निर्मल पार्क, धनकवडी) आणि लक्ष्मीकांत गंगाराम जोंधळे (वय ४५, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्या कनिष्ठ अभियंत्याची नावे आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सारंग आव्हाड यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेमध्ये अनिल शिळीमकर (वय ३२, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली होती. शिळीमकर हे विद्युत ठेकेदार म्हणून काम करतात. आंबेगावमधील दत्तनगर भागात त्यांनी विद्युत जोडणीचा ठेका घेतला होता. विद्युत जोडणी मिळावी म्हणून पद्मावती विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार भोसले यांनी मंजुरीचे आदेश ही काढले. पुढील आदेश काढण्यासाठी कनिष्ठ अभियंता सरपाले यांनी शिळीमकर यांच्याकडे वीस हजारांची लाच मागणी करून पंधरा हजार रुपये घेतले. राहिलेल्या पाच हजार रुपयांची मागणी करत होते. तसेच, भोसले यांनी पुढील कामे करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच न दिल्यास यापुढे वीज जोडणी मंजूर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिळीमकरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार भोसले यांना बुधवारी दुपारी बारा वाजता पन्नास हजारांची लाच घेताना पद्मावती येथील महावितरणच्या कार्यालयात रंगेहात पकडले. तर, शेजारीच कार्यालय असणाऱ्या सरपाले यांना एक वाजता पाच हजारांची लाच घेताना अटक केली.
दुसरी कारवाई धनकवडी येथील महावितरणच्या कार्यालयात एकच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी नितीन मुळे (वय ३७, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली होती. आंबेगाव येथील एका इमारतीचे वीज जोडणीचे काम करण्यासाठी पराते यांनी २५ हजारांची तर, गोंधळे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार त्यांना आज दुपारी एकच्या सुमारास धनकवडी येथील कार्यालयात काही अंतराने लाच घेताना पकडण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून दोन सापळ्याची तयारी करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय दातार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी.एम.काळे, प्रदीप आफळे, राजेंद्र गलांडे, भोसले, जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, वैशाली मोरे यांच्या पथकाने ही करावाई केली. एक कारवाई झाल्यानंतर ते कार्यालय बंद करून दुसऱ्या कार्यालयात कारवाई करण्यात आली. या सर्वाच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.