आजारांच्या उपचारासाठी काहीशे किलोमीटरचे जंगल पार करून आलेले माडिया-गोंड आदिवासी, उपलब्ध जागेत उपलब्ध साहित्यानिशी त्यांच्यावर केले जाणारे उपचार, आदिवासींच्या मुलांना शिकवण्यासाठी केलेले वेगळे प्रयत्न, बिबटय़ापासून मगरीपर्यंतचे प्राण्यांचे अनोखे कुटुंब..कॅमेऱ्यात जसेच्या तसे चित्रित केलेले गडचिरोली आणि भामरागडचे थरारक अनुभव पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
 पंडित भीमसेन जोशी कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात डॉ. प्रकाश आमटे यांच्या कष्टांमधून उभ्या राहिलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची छायाचित्रे बघायला मिळणार आहेत. १० डिसेंबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळात हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
लोकबिरादरी प्रकल्पात आदिवासी नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. या दवाखान्यासाठी नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात प्रकल्पाला यश मिळाले आहे. अजून एक कोटी रुपयांचा निधी उभा करण्यासाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी देणगी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकबिरादरी प्रकल्पास नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.