पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीची परीक्षा खाजगीरीत्या (अर्ज क्रमांक १७ ) देणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर  या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-ssc.ac.in  आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येईल. अर्ज भरल्यानंतर २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत. तर ११ डिसेंबरला विद्यार्थ्यांचे अर्ज, पोचपावतीची छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे.  तसेच, ११ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत.