डॉक्टर हा कुटुंबाचा मार्गदर्शक असतो. आई-वडील सांगू शकत नाहीत ते डॉक्टर समजावून सांगू शकतात. औषधोपचारापेक्षा डॉक्टरांनी साधलेला सुसंवाद रुग्णाचा अर्धा आजार बरा करतो. मात्र, आज ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पनाच लोप पावत चालली आहे, अशी खंत अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी निगडीत बोलताना व्यक्त केली. ‘तो मी नव्हेच’ हे नाटक प्रभाकर पणशीकरांनी स्वत: पाहिले व त्यांनी शाबासकी दिली हा मोठा आनंदाचा क्षण होता, असेही ते म्हणाले.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक, मधुमेह रुग्ण संघ, चक्रव्यूह मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टरांच्या गौरव सोहळय़ात १०५ डॉक्टरांचा सत्कार डॉ. ओक यांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. डॉ. संजय गव्हाणे, डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. गीता आफळे, डॉ. दिगंबर इंगोले, दलजित शिंगवी, संयोजक बाळा शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. ओक म्हणाले, अभिनयाची आवड होती. तुमचा छंद तुमच्या कामाचा भाग बनला, की त्यासारखा दुसरा आनंद नाही. काही माणसे न आवडणरे काम आयुष्यभर कंटाळत कंटाळत करत असतात. मात्र, सेवानिवृत्तीनंतर एक वर्ष तरी आवडीचे काम करायला मिळाले, की ते प्रचंड आनंदून जातात. मला तर अभिनयाची आवड होतीच. महाविद्यालयीन जीवनात अभिनयाशी धागा जुळला. जे काही करायचे ते कर, अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नको, एवढीच अपेक्षा घरच्यांनी व्यक्त केली होती. नागपूरला प्रॅक्टिस केली, दोन दवाखाने चालवले. १९७७ मध्ये ‘घेतले शिंगावर’ या नाटकाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा झाला. महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, नागपूरच्या एकांकिका स्पर्धा, गणेशोत्सवादरम्यान सादर केली जाणारी नाटके, यातून बक्षिसे मिळत गेली. डॉक्टर असतानाही मला दुसरंच काहीतरी खुणावत आहे, हे लक्षात आल्यानंतर पूर्णवेळ अभिनयाकडे वळलो. प्रास्ताविक बाळा शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शीतल कापशीकर यांनी केले. मंगेश वर्टीकर यांनी आभार मानले.