पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अपघातानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालने मोटारीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच अपघातग्रस्त मोटारीत चालकासह चारजण होते, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अल्पवयीन मुलगा मोटार चालवीत होता, हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी पोलीस अधिक पुरावे आणि जबाब संकलित करत आहेत, असेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

अपघात झाला त्या वेळी माझा चालक मोटार चालवत होता असा दावा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांनी केला आहे. मात्र, अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि सीसीटीव्ही चित्रीकरण पुरावे पोलिसांनी संकलित केले आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलगा मोटार चालवत असल्याचे दिसून आले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी या मुलाला पकडून चोप दिला होता. त्यांनीच या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या मुलाच्या काही मित्रांनी आणि नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे काही पोलिसांनी या मुलाला विशेष वागणूक दिली, तसेच त्याला पिझ्झा व बर्गर दिला असे आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>देशभरातील २३ आयआयटीत रोजगाराची दैना… यंदा किती विद्यार्थी राहिले नोकरीविना?

आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा काही खाद्यापदार्थ देण्यात आले याबाबत पुरावे मिळालेले नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (कलम ३०४) लावण्यास उशीर का झाला याची चौकशी सुरू आहे. मात्र, आमच्यावर कोणाचा दबाव आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

आमदार टिंगरे पोलीस ठाण्यात

सकाळी नऊ वाजता त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. काही काळाने मोटारीवरील चालक बदलण्याचा प्रयत्न झाला हे सत्य आहे. मोटारचालकाने सुरुवातीला सांगितले, की त्यानेच मोटार चालवली होती. त्याने कोणाच्या दबावामुळे असे सांगितले, याचादेखील तपास सुरू आहे. घटनेचा सर्व क्रम आम्हाला कळाला आहे. आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आले हे सत्य आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.