लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : देशभरातील प्रतिष्ठित, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था असा लौकिक असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांत (आयआयटी) शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याचे प्रमाण यंदा सुमारे दुपटीने वाढले आहे. यंदा तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.

आयआयटीचे माजी विद्यार्थी धीरजसिंग यांनी २३ माहिती अधिकार अर्ज, वार्षिक अहवाल, विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या संकलनातून आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांची दैना उघडकीस आली आहे. धीरजसिंग आयआयटीतील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांना मिळालेले पॅकेज याबाबत पाठपुरावा करत आहेत. आयआयटी मुंबईतील विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे, तसेच विविध आयआयटीतील कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पॅकेज कमी झाल्यासंदर्भातील बातम्या लोकसत्ताने काही दिवसांपूर्वीच दिल्या होत्या. त्यानंतर आता देशभरातील २३ आयआयटीतील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा- पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”

यंदा, २०२४मध्ये २१ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी १३ हजार ४१० विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली, तर तब्बल ३८ टक्के, म्हणजे ८ हजार ९० विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरी मिळालेली नाही.

गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतला असता यंदा नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसते. २०२३मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. त्यातील १५ हजार ८३० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली, तर ४ हजार १७० विद्यार्थी (२१ टक्के) नोकरीविना राहिले. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज वार्षिक १७.१ लाख रुपये होते, तर २०२२मध्ये प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या १७ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ४९० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. तर ३ हजार ४१० विद्यार्थ्यांना (१९ टक्के) नोकरीविना राहावे लागले. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज वार्षिक १७.२ लाख रुपये होते. त्यामुळे २०२२ ते २०२४ या काळात प्लेसमेंटसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत नाही.

आणखी वाचा-उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत लवकरच नियमावली, जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

आयआयटीत ही स्थिती असल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयांचे काय?

आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा अभ्यास केल्यास जुन्या नऊ आयआयटी आणि नव्या १४ आयआयटी यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. जुन्या आयआयटींच्या तुलनेत नव्या आयआयटीतील स्थिती अधिक बिकट आहे. त्यातून बेरोजगारी वाढत असल्याचे दिसून येते. प्रतिष्ठित आयआयटीची ही स्थिती असल्यास देशातील मोठ्या संख्येने असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांची स्थिती काय असेल, असा प्रश्न धीरजसिंग यांनी उपस्थित केला. रोजगार, नोकऱ्यांची उपलब्धता याबाबतच्या धोरणाकडे दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर ताण येतो. त्यामुळे नोकऱ्यांचा प्रश्न ओळखून तातडीने त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.