समाजकल्याण खात्याची शिष्यवृत्ती आधारकार्डशिवाय देण्याचे आदेश शासनाने काढले असले तरी त्याला उशिरा झाल्यामुळे पुणे विभागातील १० ते १५ हजार विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे पुणे विभागीय कार्यालयातून एकाच दिवशी २८ कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली तरीही ही स्थिती आहे.
समाजकल्याण विभागाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड किंवा यूआयडी देणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर यूआयडी नसतानाही शासनाने आधारसाठी नाव नोंदणी केली असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी असे आदेश दिले. मात्र, आर्थिक वर्ष संपताना हे आदेश आल्यामुळे समाजकल्याण विभागाचा गोंधळ उडाला. पुणे विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले, ‘‘पुणे विभागामध्ये ५५ हजार विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक जमा केला नव्हता. त्यांनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत आधार क्रमांक जमा करणे आवश्यक होते. आधार कार्डसाठी फक्त नोंदणी केली असली, तरी त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात यावी असे आदेश शासनाने दिले. मात्र, हे आदेश २७ तारखेला दुपारी मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटण्याचे काम सुरू झाले. आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे आणि पुढील दोन दिवस सलग सुट्टय़ा असल्यामुळे एका दिवसांत अधिकाधिक मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, अजूनही साधारण १० ते १५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.’’
याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे यांनी सांगितले, ‘‘विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आधारकार्ड मिळाले नसले, तरी आधारसाठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिक वर्ष संपत असले, तरीही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी आधारसाठी नाव नोंदणीही केलेली नाही त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार नाही.’’