पोलिसांकडे शहरात शंभराहून जास्त तक्रारी

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत विशिष्ट वेळेत फटाके वाजविण्याचे आदेश दिले असताना शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आदेश धुडकावून आतषबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या. बुधवारी रात्री पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे अशा प्रकारच्या शंभराहून जास्त तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. न्यायालयाचा आदेश भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून मात्र एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके उडविण्यास परवानगी दिली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादादेखील न्यायालयाने ठरवून दिली आहे. शहरात सर्वाधिक फटाके लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ भागातील व्यापारी पेठेत उडवले जातात. गेल्या काही वर्षांपासून शहरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, काकासाहेब गाडगीळ, एस. एम. जोशी पुलावर फटाके उडविण्यासाठी गर्दी होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील विविध पुलांवर तरुणाईची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत पुलावर फटाके उडवण्यात आले. पोलिसांकडून पेटते आकाशदिवे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पेटते आकाशदिवे झाडांवर तसेच घराच्या छतावर पडून आग लागते. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी पेटत्या आकाशदिव्यांवर बंदी घातली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील विविध पुलांवर जमलेल्या तरुणांकडून मोठय़ा प्रमाणावर पेटते आकाशदिवे तसेच बाण सोडण्यात आले. पुलांवर फटाक्यांच्या माळादेखील लावण्यात आल्या. फटाक्यांच्या माळा लावल्यामुळे पुलांवर मोठय़ा प्रमाणावर कचरा झाला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत शहरात आतषबाजी सुरू होती. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) शंभराहून जास्त तक्रारी करण्यात आल्या होत्या. फटाक्यांच्या तक्रारी आल्यानंतर नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या बाबतची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे पथक ज्या भागातून तक्रारी आल्या होत्या, त्या भागात गेले. मात्र, कारवाई नेमकी काय झाली हे मात्र कळू शकले नाही.

न्यायालयाचे आदेश

रस्त्यावर फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. अग्निबाण तसेच पेटते आकाशदिवे सोडणे, १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलीस अधिनियम १९९१च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.