आधीची नगरपालिका व पुढे महापालिका बनलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदावर आतापर्यंत मराठा आणि माळी समाजाची जणू मक्तेदारी होती. आता या महत्त्वाच्या आणि मानाच्या पदावर प्रथमच आदिवासी समाजातील सदस्याची वर्णी लागणार असून यासाठी एक नव्हे तर तीन प्रबळ दावेदार आहेत.
पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ मध्ये झाली. भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतर, पिंपरीगावातील भिकू वाघेरे, सांगवीतील नानासाहेब शितोळे, आकुर्डीतील तात्या कदम, पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट, पिंपळे-सौदागरचे सादबा काटे, पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे, चिंचवडचे आझम पानसरे, भोसरीतील विलास लांडे, फुगेवाडीचे रंगनाथ फुगे, पिंपरीगावातील संजोग वाघेरे, प्राधिकरणातील आर. एस. कुमार, चिंचवडच्या अनिता फरांदे, नेहरूनगरचे हनुमंत भोसले, निगडीचे मधुकर पवळे, पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप, खराळवाडीचे प्रकाश रेवाळे, शाहूनगरच्या मंगला कदम, नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर, चिंचवडच्या अपर्णा डोके, संत तुकारामनगरचे योगेश बहल आणि भोसरीतील मोहिनी लांडे यांनी महापौरपद भूषवले आहे. आतापर्यंतच्या महापौरपदाच्या प्रवासात स्थानिक मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर. एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या इनिंगनंतर २०१४ च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. या प्रवर्गातील रामदास बोकड, शकुंतला धराडे आणि आशा सुपे हे तीनच चेहरे महापालिकेत आहेत. त्यांना आमदारांचे आशीर्वाद आहेत. अजितदादांच्या संमतीने त्यापैकी कोणाची वर्णी लागणार, हा राजकीय औत्सुक्याचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First mayor of aborigine community for pcmc
First published on: 21-08-2014 at 02:55 IST