पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये सध्या दुपारनंतर आकाशाची स्थिती ढगाळ होत असल्याने तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. सध्याचे तापमान सरासरीेच्या आसपास असले, तरी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या आठवडय़ात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरामध्येही दोन ते तीन दिवस पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसापूर्वी शहरातील तापमानाचा पारा ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास होता. रात्रीचे तापमानही वाढल्याने कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. बुधवारी (२० मे) शहरात ३७.२ अंश सेल्सिअस कमाल, तर २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही तापमान सरासरीच्या आसपास आहेत. त्यामुळे सध्या तरी उन्हाचा चटका आणि उकाडय़ाची तीव्रता कमी आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार २२ मेपर्यंत दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. त्यानंतर दोन दिवस निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवडय़ाच्या सुरुवातीला पुन्हा दुपारनंतर आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होणार आहे. या कालावधीत तापमानात चढ-उतार होणार आहेत.