शहरातील हॉटेल्स आणि मंगल कार्यालये यांच्याकडे शिल्लक राहिलेले चांगले अन्न गोळा करून ते भुकेल्यांना देण्याचा उपक्रम शहरात स्वयंसेवी वृत्तीने सुरू आहे आणि या उपक्रमाचा नव्या वर्षांत विस्तार होणार असून त्यामुळे हजारो भुकेल्यांना, गरजूंना, वंचितांना पोटभर अन्न मिळणार आहे.
हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयांमध्ये तसेच केटरिंग व्यावसायिकांकडे अनेकदा मोठय़ा प्रमाणावर अन्न उरते. हे उरलेले अन्न फेकून दिले जाते. हेच अन्न गोळा करून ते गरजूंच्या, वंचितांच्या मुखी देण्याचा हा उपक्रम ‘रॉबिनहूड आर्मी’ ही स्वयंसेवी संस्था पुण्यात करते. ही मूळची दिल्लीतील संस्था असून पुण्यात मार्च २०१५ मध्ये संस्थेचे काम सुरू झाले. दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष काम सुरू होते. संस्थेचे स्वयंसेवक दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत विविध हॉटलच्या पाकगृहांमध्ये तसेच मंगल कार्यालयांमध्ये जे अन्न उरलेले असते, ते गोळा करतात. त्यानंतर ते झोपडपट्टय़ा, वस्त्या आणि पदपथांवर राहणाऱ्या उपेक्षितांना, वंचितांना वाटले जाते. रात्री दहापर्यंत वाटपाचे हे काम चालते. संस्थेचे पदाधिकारी राजकुमार राठी यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या उपक्रमाचे वेळापत्रकही ठरलेले आहे. दर शुक्रवारी आकुर्डी परिसरात, शनिवारी डेक्कन जिमखाना परिसरात आणि रविवारी लष्कर परिसरात ही अन्नपदार्थ गोळा करण्याची मोहीम चालते. त्या त्या भागातील ठरावीक हॉटेल तसेच मंगल कार्यालयांची या उपक्रमामुळे मोठी सोय झाली आहे. त्यांच्या स्वयंपाकघरातील अन्न आता वाया न जाता ते गरजूंना मिळते. मुख्य म्हणजे या उपक्रमात हॉटेलमधील ग्राहकांनी टाकून दिलेले किंवा शिळे वा खराब झालेले, उष्टे अन्न गोळा केले जात नाही. फक्त स्वयंपाकघरात जे अन्न शिल्लक राहिलेले असते तेच गोळा केले जाते. या कामाचे आणखी एक विशेष म्हणजे संस्था कोणतीही आर्थिक देणगी स्वीकारत नाही. प्रत्यक्ष कामाची तयारी असलेल्यांना कोणालाही या उपक्रमात सहभागी होता येते.
आता उपक्रमाचा विस्तार
संस्थेतर्फे सध्या आठवडय़ात तीन दिवस अन्न गोळा करण्याचे काम चालते. मात्र हा उपक्रम चांगला असल्यामुळे इतर दिवशी देखील तो करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षांत आठवडय़ाचे सर्व दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात अन्न गोळा करण्याचा उपक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरून शिल्लक राहिलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचेल, असेही राठी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food to starving peoples by robinhood army
First published on: 01-01-2016 at 03:21 IST