पिंपरी : पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिकेसाठी १७ झाडे तोडल्यानंतर आता चार मेट्राे स्थानकांना अडथळा ठरणारी १६२ झाडे ताेडण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव महामेट्राेने महापालिकेच्या उद्यान विभागाला सादर केला आहे.

शहरात पिंपरी ते दापाेडी या साडेसात किलोमीटर मार्गावर मेट्राे धावत आहे. पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही सहा मेट्राे स्थानके आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५ किलोमीटर अंतर मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी ९१० कोटी १८ लाखांचा खर्च आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प अशी चार स्थानके आहेत. ती उभारण्यासाठी अडथळा ठरणारी चिंचवड स्टेशनसह या मार्गावरील १६२ झाडे ताेडण्यासाठी महामेट्राे प्रशासनाने महापालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

पिंपरी ते निगडी ही मेट्राे मार्गिका आणि स्थानकांसाठी झाडे तोडणे योग्य नाही. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. मेट्राेने झाडे न ताेडता काम करावे. – सचिन काळभाेर, सामाजिक कार्यकर्ते

मेट्राे स्थानकाला अडथळा ठरणारी १६२ झाडे ताेडण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मेट्रोकडून आला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वृक्षसंवर्धन समितीच्या पुढील बैठकीत याबाबत निर्णय हाेईल. एखादे झाड २० वर्षांचे असेल, तर त्या बदल्यात २० झाडांची लागवड मेट्राे प्रशासनाकडून करून घेण्यात येणार आहे. – उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो मार्गिका आणि स्थानकासाठी अडथळा ठरणारी झाडे हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. काही झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. – हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो