राज्यात पावसाळी स्थिती; वादळी वाऱ्यांचा अंदाज

जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पश्चिम राजस्थानमध्ये सध्या चक्रवाती स्थिती आहे. पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत त्याचा विस्तार आहे. त्यामुळे उत्तरेकडे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होऊन पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात वादळी वारेही वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशाच्या मध्य भागामध्ये उत्तर-दक्षिण पट्टय़ात चक्रवाती परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील काही भागातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ईशान्य भारत, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. देशाच्या मध्य भागातील पावसाळी स्थितीमुळे राज्यातही काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ होऊन गारवा कमी झाला आहे.

विदर्भामध्ये पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात मागे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, त्याचाही परिणाम अद्यापी राज्याच्या वातावरणावर होत आहे. त्यामुळे सध्या तरी थंडीची तीव्रता कमी झाली असली, तरी येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वात कमी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.