बंगलोर-मुंबई बाह्य़वळण महामार्गावर सुतारवाडी येथे मोटारीची पीएमपीएलला धडक लागून झालेल्या अपघातात माजी आमदार यशवंत पाटील यांचे चिंरजीव प्रदीप यशवंत पाटील (वय ३२, रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांचा मृत्यू झाला. तर, इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
सत्यदेव ओझा (वय ५३), प्रकाश शिवाजी जाधव (वय ३०), भाऊ शामराव आंबेकर (वय ५०) आणि विजय सावंत अशी जखमींची नावे आहेत. प्रदीप हे काँग्रेसचे माजी आमदार यशवंत पाटील यांचे चिरंजीव होते. ते यशवंत शिक्षक प्रसारक मंडळाचे संचालक होते. जखमी हे त्यांच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप पाटील त्यांचे सहकारी त्यांच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कामासाठी दोन स्कॉर्पिओ मोटारीतून कोल्हापूरहून मुंबईला निघाले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील सुतारवाडी येथे त्यांच्या मोटारीची पीएपीएल बसला पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये पाटील व इतर गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या स्कॉर्पिओ मोटारीतून जखमींना तत्काळ पिंपरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाटील यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून चालक जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. या सर्वावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.