प्रत्येक दृकश्राव्य गोष्ट आता इंटरनेटवरून ‘डाऊनलोड’ केली जाते. ‘म्युझिक कंपन्यां’च्या व्यवसायाला याचा प्रचंड फटका बसला. या परिस्थितीतही काही कंपन्या आजच्या काळाशी जुळवून घेत मार्ग काढत आहेत, आपली ‘ओरिजिनॅलिटी’ टिकवून आहेत. त्यातलेच एक पुणेरी नाव म्हणजे ‘फाउंटन म्युझिक कंपनी’.

लहानपणीचा काळ आठवा..एखाद्या गाजलेल्या चित्रपटाची तुफान गाजलेली गाणी आपल्या संग्रही हवीतच, असा कौटुंबिक सुखसंवाद एकदा तरी झालेला आठवेल! मग सहकुटुंब जाऊनच त्या कॅसेटची खरेदी व्हायची आणि सुटीच्या दिवशी निवांत वेळी ती घरातल्या छोटय़ा ‘टेप-रेकॉर्डर’वर वाजवली जायची. पुढे सीडी-डीव्हीडी आल्या आणि तो आनंद हरवला. आता तर ‘ऐकण्याची’ जवळपास प्रत्येक गोष्ट इंटरनेटवरून ‘डाऊनलोड’ केली जाते. ‘म्युझिक कंपन्यां’च्या व्यवसायाला याचा प्रचंड फटका बसला. या परिस्थितीतही काही कंपन्या आजच्या काळाशी जुळवून घेत मार्ग काढत आहेत, आपली ‘ओरिजिनॅलिटी’ टिकवून आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे ‘फाउंटन म्युझिक कंपनी’. सीडी-डीव्हीडींच्या क्षेत्रात ‘फाउंटन’ हे नाव माहीत नाही असे कुणी नसेल, पण ही पुण्याची कंपनी आहे हे अनेकांना ज्ञात नसते.

article about dutch singer emma heesters
व्यक्तिवेध : एमा हिस्टर्स
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

प्रचंड स्पर्धेच्या युगात आपले वेगळेपण टिकवणारी आणि तंत्रज्ञानातील बदलाने म्युझिक कंपन्यांच्या क्षेत्रालाच हादरा दिल्यावरही धीराने उभी राहिलेली फाउंटन म्युझिक कंपनी १९८४-८५ मध्ये सुरू झाली. कांतिलाल ओसवाल, नरेश ओसवाल आणि महेंद्र ओसवाल हे तीन बंधू कंपनीचे भागीदार. ओसवाल कुटुंब मूळचे राजस्थानचे; पण जवळपास शंभर वर्षांपूर्वी पुण्यात येऊन अस्सल पुणेकर झालेले. ओसवाल बंधूंनी आधी १९८० मध्ये कॅसेटच्या व्यवसायात वितरक म्हणून काम सुरू केले. अल्पावधीतच म्युझिक कंपन्यांच्या व्यवसायातील बारकावे त्यांनी आत्मसात केले आणि स्वत:ची कंपनी सुरू केली. त्याच सुमाराला त्यांच्यासारख्याच अनेक वितरकांनी म्युझिक कंपन्या काढायला सुरूवात केली होती. त्यामुळे काळ प्रचंड स्पर्धेचा.

या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी विविध कलाक्षेत्रे चोखाळून पाहावी लागतात. सर्व संगीतप्रकारांमध्ये वावर असणे गरजेचे असते. त्याचा फाउंटनला फायदा झाला. त्यांनी नवीन आणि ‘ओरिजिनल’ रेकॉर्डिगवर भर दिला. जेव्हा फाउंटन या क्षेत्रात आली तेव्हा म्युझिक कंपन्यांच्या प्रकाशनात ‘कव्हर व्हर्जन’ची धूम होती. इतर गायकांनी गायलेली गाणी दुसऱ्यांच्या आवाजात रेकॉर्डिग करून आणली जात होती. ती त्या काळी ‘हिट’ झाली असतीलही, परंतु आज मालकी हक्कानुसार त्या कंपन्यांना काही फायदा होत नाही. फाउंटनची जवळपास ९५ टक्के उत्पादने ‘ओरिजिनल’ प्रकारची आहेत, असे महेंद्र ओसवाल सांगतात.

सुरूवातीला त्यांनी आपल्या हातात असलेल्या ‘मार्केट’मध्ये चालेल असे संगीत आणले. त्यात लोकसंगीत, लावण्या, ग्रामीण भागात चालणारी कीर्तने, भक्तिसंगीत प्रामुख्याने होते. अल्पजीवी ठरणाऱ्या आणि चिरकाळ टिकणाऱ्या संगीतातील फरकाची जाण त्यांना होती. जे लोकांना दीर्घकाळ ऐकायला आवडेल ते बनवण्याकडे त्यांचा कल नेहमी राहिला. व्यवसायाचा विस्तार होत गेला तशी बालगीते, कथाकथन आणि शास्त्रीय संगीताच्या कॅसेटस् आणि सीडीज् त्यांनी आणल्या. शास्त्रीय संगीताचे जवळपास शंभर अल्बम्स फाउंटनने आणले आहेत. नंतरचा टप्पा होता चित्रपटांचा. अनेक जुन्या मराठी चित्रपटांचे हक्क त्यांनी घेतले व त्याच्या सीडी आणल्या. मराठी नाटकांची रेकॉर्डिग्ज देखील त्यांनी प्रकाशित केली. त्याच्या डीव्हीडी देखील आणल्या. मराठीतील ‘अ‍ॅनिमेटेड कार्टून फिल्म्स’च्या सीडी हे त्यांनी आजमावून पाहिलेले एक वेगळे क्षेत्र होते. नावाजलेल्या कलाकारांचे आवाज वापरलेल्या या गोष्टींना लहान मुले आणि त्यांच्या पालकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि फाउंटनसाठी तो एक ‘टर्निग पॉईंट’ ठरला. पुढे मराठी टीव्ही वाहिन्यांवर आणि इंग्रजीत भाषांतरित करून इंग्लिश टीव्ही वाहिन्यांवरही या गोष्टी दाखवल्या गेल्या.

पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शंकर पाटील या ज्येष्ठ लेखकांच्या कथाकथनाची रेकॉर्डिग्ज आधी ‘अलूरकर म्युझिक’ने आणली होती. त्यांच्याकडून फाउंटनने त्याचे हक्क घेतले आणि ती प्रकाशित केली. प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर यांच्या व्याख्यानांच्या सीडी, प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर, राहुल देशपांडे, देवकी पंडित, संदीप खरे- सलील कुलकर्णी यांची रेकॉर्डिग्ज देखील आणली. निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या कीर्तनाच्या गाजलेल्या कॅसेटस् असोत, किंवा प्रभाकर जोग यांचे अजरामर ठरलेले व्हायोलिनवादन असो; विविध प्रकारची रेकॉर्डिग्ज त्यांच्याकडे मिळतात.

या क्षेत्रात २००५ मध्ये कॅसेटस्ची चलती होती. त्यानंतर तंत्रज्ञान जलदगतीने बदलले आणि सीडी-डीव्हीडी प्लेअर आले. कमी किमतीत अधिक ‘डेटा’ देण्यासाठी ‘एमपीथ्री’ चालू लागल्या. सीडीचा काळ २०१३-१४ पर्यंतच टिकला. आता एमपीथ्री आणि डीव्हीडी चालते, पण एकूणच मागील तीन वर्षांत या क्षेत्राला फटका बसला आहे. पूर्वीच्या तुलनेत म्युझिक कंपन्यांचा व्यवसाय १० टक्केही राहिला नाही, असे महेंद्र ओसवाल सांगतात. पूर्वी पुण्यात कॅसेटस् आणि सीडीची छोटी दुकाने ४०० ते ५०० होती, अगदी पानटपरीवाल्याकडेही कॅसेटस् विकत मिळत. आता केवळ ८ ते १० दुकाने उरली आहेत. बदललेले तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा प्रचंड वाढलेला वापर हे त्याचे कारण. चित्रपट किंवा गाणी फुकट मिळत असताना, मुबलक ‘पायरसी’ होत असताना सीडी-डीव्हीडीकडे कल असलेले लोक कमीच!  याचा आणखी मोठा परिणाम नवीन संगीत बाजारात येण्यावर झाला. यात दोन प्रकार असतात. म्युझिक कंपनी कलाकारांचे ‘रेकॉर्डिग’ करते किंवा कलाकाराने आधीच रेकॉर्ड केलेले संगीत प्रकाशित करते. असे कोणत्याही प्रकारचे नवीन प्रकाशनच आता मंदावले आहे.

या परिस्थितीत म्युझिक कंपन्यांना भविष्याचा वेगळा विचार करावा लागतो आहे. फाउंटननेही तो केला आहे. त्यांनी स्वत: विकसित करून प्रकाशित केलेली प्रकाशने आणि एकूणच मराठी श्राव्य कलेच्या विविध क्षेत्रांतील त्यांचा पसारा ते आता ‘डिजिटल’ माध्यमात आणत आहेत. या संगीताच्या ‘डाऊनलोडिंग’ आणि ‘रिंगटोन’ सेवांसाठी इतर कंपन्यांना हक्क देणे त्यांनी आता सुरू केले आहे. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहणे एवढेच ध्येय न बाळगता काळाबरोबर बदलणे आणि स्वत:चे वैशिष्टय़ राखणे त्यांना महत्त्वाचे वाटते. आणि हीच गोष्ट त्यांना पुण्याचा ‘ब्रँड’ बनवते!

संपदा सोवनी sampada.sovani@expressindia.com