चाकणमध्ये जादा पगाराचे आमिष दाखवून कामावर घेण्याचा प्रयत्न

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर, चाकण आणि परिसरातील अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी जाणे पसंत केले आहे. सरकारच्या परवानगीनंतर चाकण परिसरातील उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, उद्योगांना कामगारांची चणचण भासू लागली आहे. त्यातून कामगार पळवापळवी देखील सुरू झाली असून काही उद्योजकांनी कामगारांना जादा पगाराचे आमिष दाखवून कामगारांना कामावर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काळात कामगारांचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही अटीशर्तीवर चाकण परिसरातील उद्योग सुरू झाले आहेत. चाकण, म्हाळुंगे आणि परिसरामध्ये साडेसहाशे छोटे मोठे उद्योग आहेत. बजाज, महिंद्र, व्होक्सव्ॉगन यासारख्या मोठय़ा कंपन्यांनीही आपले उद्योग सुरू केले आहेत. चाकण परिसरात साडेसहाशे उद्योगांपैकी चारशे उद्योग सुरू झाले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करुन उद्योगांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. उद्योग सुरू झाले असले तरी उद्योगांना कामगारांची उणीव भासत आहे. चाकण परिसरामधील बहुतांश कंपन्यांमध्ये परराज्यातील कामगार मोठय़ा प्रमाणात काम करत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक कामगार मूळ गावी गेले आहेत.

बहुतांश कामगार टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर गावी जाण्याची इच्छा असताना ते शहर आणि परिसरामध्ये अडकून पडले. काम नसल्यामुळे अनेक कामगारांचे हाल झाले. त्यामुळे राज्य सरकारने गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर पोलीस परवाना घेऊन कामगारांनी गावी जाण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम उद्योगांवर झाला असून उद्योजकांना कंपन्यांमध्ये कामगार मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातून दुसऱ्या उद्योगातील कामगार पळविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. तर काही उद्योजकांनी कामगारांना पगारामध्ये वाढ करण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चाकण परिसरामध्ये कामगरांच्या मुद्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारच्या आश्वासनानंतर चाकण परिसरातील उद्योजकांनी उद्योग सुरू केले आहेत. साडेसहाशे उद्योगांपैकी चारशे उद्योग सुरू झाले आहेत, मात्र कामगार गावी गेल्यामुळे कामगारांची उणीव भासत आहे.

दिलीप भटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिज, चाकण