दगडूशेठ गणपती मंदिर येथे घातपात होणार असल्याची खोटी माहिती देणारा शेख इमरान शेख मेहमुद कुरेशी (वय २४, रा. गांधीनगर झोपडपट्टी, बोपोडी, मूळ वाशीम) याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरेशीने दिलेल्या माहितीमुळे शनिवारी पहाटे सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पण, तो दारूच्या नशेत खोटे बोलल्याचे शनिवारी सायंकाळीच दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीत आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड येथील लोहमार्गावर कुरेशी हा जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला उपचारासाठी सुरुवातीला तेथील रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी त्याने दगडूशेठ गणपती मंदिरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. त्याची माहिती पुणे पोलिसांना देऊन शनिवारी पहाटे दोन वाजल्यापासून मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. मंदिर परिसर वाहतुकीसाठी बंद करून बॉम्ब शोधक व नाशक पथकाची संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. शेवटी काहीच न सापडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कुरेशीकडे कसून चौकशी सुरू होती.
ससून रुग्णालयात उपचार घेताना त्याने पोलिसांना सांगितले, की पाकिस्तानी नागरिक शोएब याने दगडूशेठ मंदिरात बॉम्बची बॅग ठेवली तर वीस हजार रुपये देईल. त्यानी आपल्याला खडकी येथे मारहाण केल्याचे तो सांगत होता.  पुण्यात गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट असल्यामुळे त्या माहितीची शहानिशा करण्यात आली. त्याच बरोबर कुरेशी, त्याचे नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतर तो खोटे बोलत असल्याचे दिसून आले. त्यावरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात पुणे गुन्हे शाखेचे कर्मचारी शरद दशरथ जाधव (वय ५१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरेशीच्या विरुद्ध पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा जबाब देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुहास नाडगौडा हे अधिक तपास करत आहेत. कुरेशीवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत पुणे रेल्वे पोलीस विभागाचे अधीक्षक पाटणकर यांनी सांगितले, की या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले नाही. कुरेशी हा पडला की मारले हे निष्पन्न झालेले नाही. तो देत असलेली माहिती खरी खोटी याची शहानिशा केली जात आहे. या प्रकरणी अनेकांकडे चौकशी केली आहे. मात्र, कोणाला ही अटक अथवा ताब्यात घेतलेले नाही.