पिंपरी-चिंचवडमध्ये आरोग्य विभागाची धडक मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरात कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केल्यानंतर आणि सातत्याने या विषयावरून चहूबाजूने टीका होऊ लागल्यानंतर उशिरा का होईना महापालिकेने मनावर घेतले आहे. स्वच्छ व सुंदर शहर करण्यापूर्वी कचऱ्याच्या समस्येतून शहर मुक्त करण्यास प्राधान्य देत महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड हे कागदोपत्री स्वच्छ व सुंदर शहर आहे. शहरातील कचऱ्याच्या समस्येने सगळेच मेटाकुटीला आले आहेत. प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पालिका पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी सातत्याने तक्रारी करूनही फरक पडत नाही. स्वच्छतेच्या विषयावर बैठक घेत सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, त्यानंतरही अपेक्षित सुधारणा दिसली नाही. ऐन दिवाळीतही शहरात कचऱ्याचे साम्राज्य होते. या पाश्र्वभूमीवर, २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध बैठकांचे सत्र घेण्यात आले. स्वच्छतेच्या सध्याच्या यंत्रणेचा आढावा घेत स्वच्छताविषयक कामांचे नियोजन करण्यात आले. सहआयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले असून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर सूचनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

सकाळी सात ते अकरादरम्यान सफाईची कामे पूर्ण झाली पाहिजेत. मोकळे भूखंड तसेच कचऱ्याचे ढीग साचले आहेत, याची माहिती संकलित करून तातडीने कचरा उचलला गेला पाहिजे. कचऱ्याचे ढीग साचता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. कचराकुंडय़ा भरून वाहता कामा नये, त्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे. कचराकुंडय़ांचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. सोमवारी अथवा गुरुवारी कचराकुंडय़ांभोवती जंतूनाशक पावडरची फवारणी झाली पाहिजे. कचराकुंडय़ांच्या संख्येनुसार कामगार नियुक्त करावेत. त्यांच्या कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी ठेवावी. बेवारस राडारोडा तातडीने उचलला गेला पाहिजे. राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. दुकानदारांना कचरा जमा करण्याची आवश्यक कचरापेटीची व्यवस्था करावी. सोसायटय़ांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत प्रवृत्त करावे. शहरातील मोठे चौक, बसथांबे, पूल, भुयारी मार्ग, सेवा रस्ते आदी ठिकाणी नियमित झाडलोट झाली पाहिजे. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे कचरा संकलन केंद्र हवे. घंटागाडीचे निश्चित वेळापत्रक असले पाहिजे. त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. घंटागाडय़ा चालकांना घंटा तसेच शिट्टय़ा उपलब्ध करून द्याव्यात. स्पिकरच्या माध्यमातून जनजागृती करावी. उपलब्ध वाहनांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. नादुरूस्त कुंडय़ा दुरूस्त कराव्यात. कचरा वाहतूक करताना त्यामध्ये राडारोडा भरला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.