गणेशोत्सवाच्या स्वरूपात काळानुरूप बदल होत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक मंडळांकडून काही स्तुत्य उपक्रम राबविले जात असले तरी उत्सवामधील दोष दूर करून तो पुढे नेण्याची जबाबदारी सर्वच कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी मंडळांनी एकत्र येऊन आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केले. मंडळे आणि नागरिक एकत्र आले तर कोणताही कायदा न करता उत्सवाला आणखी विधायक स्वरूप प्राप्त होऊन उत्सव सर्वाचा होईल, असेही त्यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ आणि ‘माणिकचंद उद्योग समूहा’च्या वतीने ‘गणांचा नायक सिद्धिविनायक’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, उद्योगपती रसिकलाल धारीवाल, शोभाताई धारीवाल, जान्हवी धारीवाल, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘मनोरंजन, प्रबोधन असे स्वरूप असलेला हा उत्सव मंडळांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीपर्यंत येऊन पोहोचला आहे. नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येतात त्यावेळी नेहमीच चांगली गोष्ट झाल्याचे पहावयास मिळते. उत्सवातील काही वाईट प्रवृत्ती टाळण्याची नैतिक बांधिलकी आपल्यावर आहे, याचे भान मंडळांना आहे. मात्र काही तरी भव्य-दिव्य करण्याच्या प्रयत्नात कळत-नकळत मंडळांकडून मर्यादांचे उल्लंघनही होते. त्यामुळे मंडळांनाच त्याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. उत्सवाच्या निमित्ताने समाज सुदृढ, संघटित आणि एकत्रित येण्यासाठी विचारमंथन आवश्यक आहे. राजकीय पक्षांना काही मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंडळांनीच काही गोष्टींचे स्वत:हून पालन करणे आवश्यक आहे. सामाजिक उपक्रमांची माहिती अहवालात देणे, सक्तीने वर्गणी वसुल न करण्यावर भर द्यावा लागेल. ही जबाबदारी मंडळांची आहेच पण नागरिकांनी त्यासाठी एकत्र येऊन उत्सवाची आचारसंहिता तयार करणे आवश्यक ठरेल. आचारसंहिता म्हणजे कायदा नाही. पण प्रभावी अंमलबजावणीतून समाजाभिमुखता निश्चित जपता येईल.’

महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, गणेशोत्सव हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनेचा उत्सव आहे. हा केवळ उत्सव नसून ती चळवळ आहे. ही चळवळ आणि संस्कृती रुजली पाहिजे. मंडळांचे सर्वच चुकते असे नाही. मात्र दोष दूर करून उत्सवाची ही घोडदौड पुढे चालू ठेवावी लागणार आहे. यावेळी बोलताना शोभाताई धारीवाल यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ‘लोकसत्ता’ सारख्या दैनिकाने याकामी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांनी अभिनंदनही केले. फौउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात योगदान देण्यात येते. त्याचा गणेशमंडळांनीही अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविक भाषणात श्री. कुबेर यांनी गणेशोत्सवाकडे ‘लोकसत्ता’ विधायक दृष्टीने पाहात असल्याचे सागितले. ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमामध्ये उत्सवातील दहा दिवस विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा परिचय करून देण्यात येतो व त्यांना मदतीचे आवाहन केले जाते. महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमास गेली पाच वर्षे भरभरून प्रतिसादही दिला आहे.

या कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पवार, ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक, शिल्पकार विवेक खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांची भाषणे झाली. रसिका मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य वार्ताहर विनायक करमरकर यांनी आभार मानले.